![]()
‘विधानसभेत स्वतःच्या राजकीय सोयीसाठी भाजप उमेदवारांच्या तोंडाला फेस आणणाऱ्यांचे लाड आता पदवीधर निवडणुकीत कशाला करायचे? ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना जवळ करण्याची भाजपला गरज नाही,’ अशा अत्यंत तिखट आणि शेलक्या शब्दांत माजी आमदार संजय केणेकर यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) संभाव्य उमेदवारावर तोफ डागली. पक्षाने मराठवाड्यात भाजपला ‘मैत्रीपूर्ण लढती’ची परवानगी द्यावी, अशी मागणी करत केणेकरांनी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आणला आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षाने २ वर्षांपासून ताकद झोकून दिली असून 2 लाखांहून अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी केल्याचा दावा माजी आमदार केणेकर यांनी केला आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पातळीवरून ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटण्याची चिन्हे दिसू लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. दरम्यान, केणेकरांचा रोख थेट चौथ्यांदा रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या आमदार सतीश चव्हाण यांच्यावर आहे. “कालपर्यंत भाजपच्या पराभवासाठी जीवाचे रान करायचे आणि आज भाजपच्याच जीवावर पदवीधरची आमदारकी लाटायची, हा दुटप्पीपणा खपवून घेतला जाणार नाही,’ अशी भावना स्थानिक नेत्यांमधून व्यक्त होत आहे. निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील महायुतीत लढायचे की स्वतंत्र रिंगणात उतरायचे किंवा मैत्रीपूर्ण लढत द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. त्यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे. – सतीश चव्हाण, आमदार, पदवीधर मतदारसंघ. भाजपकडे सक्षम उमेदवार भाजपने मतदारसंघात तळागाळापर्यंत मोठी तयारी केली आहे. आम्ही लाखो पदवीधरांचे संघटन केल्याने पक्षाने येथे स्वबळावर लढण्यास परवानगी द्यावी. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असेल. – किशोर शितोळे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष कार्यकर्त्यांची मेहनत मित्रपक्षाच्या पदरात भाजपने २ वर्षे घाम गाळून पदवीधरांची नोंदणी केली. आता ऐनवेळी ही तयार झालेली राजकीय जमीन राष्ट्रवादीला आंदण दिल्यास तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचणार आहे. मित्रपक्षाच्या सोयीसाठी निष्ठावंतांना डावलून दुसऱ्याची पालखी वाहणे भाजपला परवडणारे नाही, हाच संदेश केणेकरांच्या बंडाच्या पवित्र्याने पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवला आहे. मात्र, सलग तीन वेळा विजय मिळवला असल्यामुळे या जागेवरील राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा प्रबळ असल्याची जाणीव भाजपच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आहे. पदवीधरमध्ये नेत्यांची अंतर्गत ‘मॅचफिक्सिंग’ पदवीधरच्या रणांगणात भाजपमधीलच काही बड्या नेत्यांची छुपी राजकीय गणिते दडलेली आहेत. सतीश चव्हाण पदवीधरच्या माध्यमातून विधान परिषदेवर गेले तर गंगापूरसह जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणातील संभाव्य डोकेदुखी कायमची मिटेल, असा एका गटाचा हिशेब आहे. चव्हाण विधान परिषदेत सुरक्षित झाले तर लोकसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा लाभ उठवता येईल यावर काही नेत्यांचा डोळा आहे. पक्षाने संयोजकपद दिल्याने केणेकरांना उमेदवारीची पक्की आशा होती; मात्र मित्रपक्षाच्या दबावापुढे निष्ठावंतांचा बळी जात असल्याची चर्चा सुरू आहे.
Source link
महायुतीत पदवीधरवरून ठिणगी:विधानसभेत भाजपला त्रास देणाऱ्यांबरोबर ‘पदवीधर’मध्ये जवळीक का- केणेकर, मैत्रीपूर्ण लढतीची भाजप कार्यकर्त्यांची मागणी