![]()
भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी जेएसडब्ल्यू आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात बॅटरी सेल तंत्रज्ञानाच्या संशोधन व विकासासाठी भागीदारी करण्यात आली आहे. भारतीय हवामान आणि विविध उपयोगांच्या गरजा लक्षात घेऊन प्रगत बॅटरी सेलची रचना, चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात येणार असून, दोन्ही टप्प्यांसाठी मिळून ८०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बॅटरी सेल संशोधन व विकास केंद्र उभारण्यात येईल. या केंद्रात स्वदेशी लिथियम-आयन, सोडियम-आयन तसेच अन्य प्रगत रसायनशास्त्रावर आधारित बॅटरी सेलची रचना, संगणकीय सिम्युलेशन आणि प्रोटोटायपिंग केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात या केंद्राचा विस्तार सेल प्रमाणीकरण केंद्र म्हणून करण्यात येईल. यामध्ये १०० ते ६०० अँपिअर-तास क्षमतेचे बॅटरी सेल तयार करण्याची क्षमता विकसित केली जाणार आहे. भारतीय परिस्थितीत या सेलची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा तपासण्यावर भर दिला जाणार आहे. जगातील अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाच्या तोडीची कार्यक्षमता असलेली, मात्र भारतातील हवामान आणि विविध क्षेत्रांच्या गरजांनुसार उपयुक्त बॅटरी तंत्रज्ञान विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. केंद्रामध्ये संयुक्त संशोधन, संशोधनपर प्रकाशने, विविध प्रकल्प तसेच बौद्धिक संपदा निर्मितीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विद्यापीठातील संशोधन आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्याच्या दृष्टीनेही ही भागीदारी महत्त्वाची मानली जात आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी जेएसडब्ल्यूच्या अभियंत्यांसोबत प्रत्यक्ष आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर काम करतील. त्यामुळे प्रयोगशाळेतील संशोधन उद्योगाच्या गरजांशी जोडले जाऊन बॅटरी तंत्रज्ञानाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. या माध्यमातून भारताच्या भविष्यातील ऊर्जा गरजा लक्षात घेऊन उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याचे व्यापक प्रारूप विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Source link
जेएसडब्ल्यू आणि सीओईपीची बॅटरी सेल संशोधनासाठी भागीदारी:स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी 800 कोटींहून अधिक गुंतवणूक, दोन टप्प्यांत होणार अंमलबजावणी