Headlines

भेळ खाल्ल्याने 50 जणांना विषबाधा:मालेगावच्या आठवडी बाजारातील घटना; मंत्री दादा भुसेंकडून रुग्णांची पाहणी, चौकशीचे दिले आदेश




मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे आठवडे बाजारात एका दुकानदाराकडून भेळ-भत्ता खाल्ल्याने 50 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असून सर्वांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने सामान्य रुग्णालयात धाव घेत रुग्णांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. नांदगाव बुद्रुक गावात भरलेल्या आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्रामस्थांनी एका स्थानिक विक्रेत्याकडून भेळ-भत्ता विकत घेऊन खाल्ला होता. मात्र, त्यानंतर काही वेळातच नागरिकांना मळमळ, जुलाब आणि उलट्यांचा तीव्र त्रास सुरू झाला. एकाच वेळी अनेकांना, विशेषतः लहान मुलांना त्रास होऊ लागल्याने गावात मोठी घबराट पसरली. यानंतर ग्रामस्थांनी तत्परता दाखवत सर्व रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. खासगी डॉक्टरांकडून तातडीने मदत रुग्णालयात एकाच वेळी 50 हून अधिक रुग्ण दाखल झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. अचानक रुग्ण वाढल्याची माहिती शहरात पसरताच, मालेगावमधील अनेक खासगी डॉक्टरांनी माणुसकीच्या नात्याने थेट सरकारी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी सरकारी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास मदत केली. वेळेवर मिळालेल्या या मोलाच्या वैद्यकीय मदतीमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात यश आले. मंत्री दादा भुसे यांच्याकडून सक्त सूचना रुग्णालयात पोहोचल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला. त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि सर्व रुग्णांवर योग्य व तातडीचे उपचार करण्याच्या सक्त सूचना दिल्या. प्रशासनाने कोणतीही हयगय न करता रुग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. रुग्णांची प्रकृती स्थिर सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे. या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत त्यांनी प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित भेळ विक्रेत्याकडील अन्नपदार्थ खराब होते का, याची आता अन्न आणि औषध प्रशासनाकडून कसून तपासणी केली जाणार असून वैद्यकीय पथक सर्व रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *