Headlines

'बुलढाणा बिहार, तर चिखलीला तुम्ही गाझियाबाद करून ठेवलाय!':आमदार संजय गायकवाडांचा श्वेता महालेंवर घणाघात




बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील राजकीय लढाई आणि आरोप-प्रत्यारोपांची पातळी दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, शिवसैनिक महिलांना माझ्या घरातून मेसेज जात असल्याचा पुरावा जर त्यांनी मला दिला, तर मग माझ्या स्वभावाप्रमाणे मी काय करायचे ते करेल. जर यात काही तथ्य नसेल आणि शिवसैनिक बहिणींना आणि बुलढाण्यातील महिलांना बदनाम करायचा प्रयत्न असेल, तर त्यांनी इतक्या नीच पातळीपर्यंत नाही गेले पाहिजे. पुढे ते असेही म्हणाले की, सगळे हिंदुत्ववादी चारित्र्यवान लोक असून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न त्यांनी करू नये. भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुलढाण्याचा बिहार झालाय अशी टीका केली होती. यावर संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, ज्यांनी तीन-चार मर्डर केले, बलात्कार केले, लुटमार केली, ज्यांनी लोकांच्या पोरी उचलल्या, ज्यांनी संपत्ती हडप केली, रिव्हॉल्व्हर घेऊन फिरतात, ज्यांना जेल मध्ये घातले, त्यांना तुमच्या नवऱ्याने सोडवायचे काम केले, असा गंभीर आरोप महाले यांच्यावर केला आहे. पुढे संजय गायकवाड म्हणाले, काही लोकांची एमपीडीए रद्द केली. जे सहा महिने जेलमध्ये होते, त्याच्यासोबत तुम्ही जेवण करता. गुंडांना ताकद देऊन तुम्ही बुलढाणा बसवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही पूर्ण महाराष्ट्र मधील गुंड आणले तरी माझ्या बुलढाण्याचे रक्षण करण्यासाठी मी सक्षम आहे. ज्यांनी बलात्कार केला त्यांच्यासोबत तुमचा खाजगी सचिव बसतो देवेंद्रजी यांना सुद्धा सांगणे आहे की, माझे व्यक्तीगत भांडणे नसून मी माझा पक्ष वाढवण्यासाठी चिखलीत गेलो. लोकांवरील अन्याय दूर करण्यासाठी गेलो. याचा बदला म्हणून ज्यांनी बलात्कार केला, लूटमार केली, संपत्ती लुटली, त्यांच्यासोबत तुमचा खाजगी सचिव बसतो. आणि संजय गायकवाड यांच्या लोकांना मारा, काहीही करा मी बसलेलो आहे, हे हलकट धंदे बंद करा, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. अरे इतके माजू नका.. माझा बुलढाणा बिहार आहे का? त्याहीपेक्षा तुमच्या चिखलीला तुम्ही गाझियाबाद पेक्षाही भयानक करून ठेवलेले आहे. तुम्ही लोकांची प्रॉपर्टी हडप केली. प्रॉपर्टीवर आरक्षण तुम्ही टाकले, लोकांचे जीवन जगणे मुश्कील केले तुम्ही. कोणी पोस्ट टाकली म्हणून त्याला तडीपार करता. अरे इतके माजू नका इतके उतू नका. ही जनता भाजपा-शिवसेनेची मतदार आहे. काहीतरी ठिकाणावर येऊन काम करा, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *