![]()
छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात आता तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) कैद्यांसाठी स्वतंत्र दुमजली बराक उभारण्यात येत आहे. नागपूरनंतर मराठवाड्यात होणारा हा पहिलाच प्रयोग आहे. यासोबतच चांगल्या वर्तणुकीच्या कैद्यांसाठी तब्बल १०० क्षमतेचे ‘ओपन जेल’ (खुले कारागृह) देखील साकारले जात असून या १२ कोटी १२ लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला वेगाने सुरुवात झाली आहे. हर्सूल मध्यवर्ती कारागृहाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने हे दोन मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सध्याच्या मुख्य इमारतीसमोरील मोकळ्या जागेत हे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण कामासाठी (कंपाउंड वॉलसह) १२ कोटी १२ लाख ७४ हजार रुपयांची निविदा मंजूर झाली असून, ‘मे. बाबा कन्स्ट्रक्शन’ यांच्याकडे हे कंत्राट सोपवण्यात आले आहे. सध्या या दोन्ही इमारतींचे काम जोत्याच्या (पायाभरणीच्या) पातळीपर्यंत पोहोचले आहे. भविष्यात आणखी १६ कैद्यांची सोय होणार सध्या १६ ट्रान्सजेंडर कैद्यांसाठी स्वतंत्र दुमजली बराक उभी राहत आहे. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने आणखी १६ कैद्यांसाठी अशा स्वरूपाची दुसरी स्वतंत्र दुमजली बराक उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्याला अंतिम मंजुरी बाकी आहे. ट्रान्सजेंडर कैद्यांसाठी सुरक्षित निवारा पुरुष किंवा महिला कैद्यांसोबत तृतीयपंथी बंदीजनांना ठेवल्यास सुरक्षिततेचा, भेदभावाचा आणि प्रसंगी लैंगिक शोषणाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. नव्या बराकीत तळमजला व पहिला मजला असेल. तेथे १६ ट्रान्सजेंडर कैद्यांची सोय होईल. १०० कैद्यांसाठी ओपन जेल याच आवारात १०० कैद्यांच्या क्षमतेचे स्वतंत्र खुले कारागृह उभारण्यात येत आहे. कैद्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने ओपन जेलची संकल्पना महत्त्वाची मानली जाते. प्रत्यक्ष कामास सुरुवात हर्सूल कारागृह परिसरात १०० क्षमतेचे ओपन जेल आणि १६ ट्रान्सजेंडर कैद्यांसाठी स्वतंत्र दुमजली बराक प्रस्तावित होती. या कामासाठी १२ कोटींची निविदा मंजूर झाली. कंत्राटदाराकडून कामाला सुरुवात झाली आहे. -स्मिता पवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम), छत्रपती संभाजीनगर. एका वर्षात कामाचे उद्दिष्ट सा. बां. विभागाकडून २४ नोव्हेंबर २०२५ रोजी काढलेल्या निविदेनुसार, काम पूर्ण करण्यास १२ महिन्यांची मुदत आहे. दोन्ही इमारतींचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
Source link
दिव्य मराठी ब्रेकिंग:हर्सूल जेलमध्ये ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र बराक; 100 क्षमतेचे खुले कारागृह, 12 कोटी रुपयांतून उभारणीचे काम सुरू