Headlines

जेलमध्ये 32 फोन, 20 कॉलिंग कार्ड्स अन् VIP सुविधा:वाल्मिक कराडला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचा खासदार बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप




तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड कारागृहातून राजरोसपणे आपले नेटवर्क चालवत असल्याचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. वाल्मिक कराड कारागृहात तब्बल 32 फोन वापरत असल्याचे आणि 20 कॉलिंग कार्ड्सच्या माध्यमातून बाहेरील व्यक्तींशी नियमित संपर्कात असल्याचे चौकशीत उघड झाले असूनही प्रशासन मूळ सूत्रधारांना सोडून लहान कर्मचाऱ्यांवर कारवाईचा देखावा करत असल्याचा घणाघात त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाचे ऑडिओ पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि पेनड्राइव्ह आपल्याकडे उपलब्ध असून, सरकारने या क्लिप्स फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (FSL) तपासून तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. एका कैद्याला 20-25 कॉलिंग कार्ड्स कशी मिळतात? कारागृहातील अनागोंदी कारभारावर बोट ठेवताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, “वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर सतत संपर्कात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. नियमानुसार प्रत्येक बंदीला केवळ एकच कॉलिंग कार्ड अनुज्ञेय असते. मग इतर आरोपींच्या नावावरील तब्बल 20 ते 25 कॉलिंग कार्ड्स याला कशी मिळाली? या कार्ड्सवरून तो नेमका कोणाशी संवाद साधत होता?” “माझ्याकडे असलेले सर्व रेकॉर्ड्स मी यंत्रणेकडे देण्यास तयार आहे. या ऑडिओ क्लिप्स लॅबमध्ये पाठवून संबंधितांच्या आवाजाचे नमुने तपासावेत, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.” चोर सोडून संन्याशाला फाशी; मूळ सूत्रधार मोकाट प्रशासकीय कारवाईच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेत त्यांनी सवाल उपस्थित केले. “या प्रकरणात मुख्य आरोपी आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून मुंडे आणि ढाकणे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही केवळ डोळेझाक असून ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार आहे.” “गायकवाड नावाच्या जेलरची अचानक बदली करून वादग्रस्त अधिकाऱ्यांकडे कारभार का सोपवण्यात आला? या बदल्यांमागे कोणाचे राजकीय हितसंबंध आहेत?” बॅरेक क्रमांक 9 मधील व्हीआयपी सवलतींवर आक्षेप कारागृहातील अंतर्गत व्यवस्थेवर आरोप करताना त्यांनी सांगितले. “कारागृहात एका बॅरेकची क्षमता 60 कैद्यांची असते. मात्र, वाल्मिक कराड ज्या बॅरेक क्रमांक 9 मध्ये आहे, तिथे केवळ 20 ते 30 कैदीच का ठेवण्यात आले आहेत? हा विशेष पाहुणचार कोणाच्या दबावातून सुरू आहे?” सोनेवणे पुढे म्हणाले, “कारागृहातील डॉ. पारखे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह असून त्यांची कोणाच्या शिफारशीवरून नियुक्ती झाली आहे? या संपूर्ण साखळीची चौकशी करून त्या डॉक्टरांची तात्काळ बदली करण्यात यावी.” जेल जरा सावकाश… मला कोणी सांगितले होते? या विषयावर आधी शांत राहण्याबाबत विचारले असता खासदार सोनवणे म्हणाले, “मी 100 दिवस का शांत राहिलो, याचे कारण म्हणजे एका जबाबदार व्यक्तीने मला थेट गळ्यात हात घालून ‘जेल जरा सावकाश घ्या’ असा सल्ला दिला होता. तो सल्ला कोणी दिला हे वेळ आल्यावर सांगेन; मात्र आता आमच्या विरोधात कट रचून नामानिराळे राहण्याचा ढोंगीपणा सहन केला जाणार नाही.” खासदार म्हणून कारागृहाची तपासणी करणार “लोकप्रतिनिधी म्हणून मला कारागृहाला अधिकृत भेट देण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मी स्वतः कारागृहाची पाहणी करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाकडून आलेल्या पत्राची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगरचे कारागृह डीआयजी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण रॅकेटवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,” असा इशाराही त्यांनी दिला. ————————————————– हेही वाचा… 75 कोटींचे बंगले अन् 5-5 कोटींच्या गाड्या आल्या कुठून?: धाराशिवच्या आश्रमशाळा चालकाचा मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप; शाळांचे पैसे अडवले, पीए 35 लाख मागतो! राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर धाराशिव येथील आश्रमशाळा संस्थाचालक अरुण निटूरे यांनी अत्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एका इमारतीच्या गच्चीवरून स्वतः रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये निटूरे यांनी मंत्री शिरसाट, त्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि समाजकल्याण विभागाच्या कारभारावर संतप्त सवाल उपस्थित केले आहेत. “गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांचे अनुदान वर्षानुवर्षे अडवून ठेवायचे आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर पीएंच्या माध्यमातून 35 ते 40 लाखांची उघड लाच मागायची,” असा थेट आरोप करत निटूरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *