![]()
दुबईहून इस्रायलकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात ओमानच्या को-पायलटने अपहरण व क्रॅश करण्याचा कट रचला होता. भारतीय मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांनी गंभीर जखमी असतानाही अदम्य धैर्य दाखवत हा कट उधळला आणि 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या शौर्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गौरव केला आहे. दरम्यान, मी केवळ माझे कर्तव्य बजावले, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, अशी प्रतिक्रिया स्मित माछर यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली आहे. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या थरारक घटनेनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा इस्रायलमध्ये 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा कट असल्याचा दावा केला आहे. यापूर्वी स्पाईसजेटमध्ये 9500 तासांहून अधिक काळ उड्डाणाचा आणि 2014 ते 2022 दरम्यान मुख्य वैमानिक म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या स्मित माछर यांच्या या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, एक वैमानिक म्हणून मी केवळ माझे कर्तव्य बजावले, विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्वजण सुखरूप आहेत, याबद्दल मी कृतज्ञ आहे, अशी पहिली प्रतिक्रिया कॅप्टन स्मित माछर यांनी दिली असून, त्यांच्या या शौर्याची आणि कर्तव्यनिष्ठाची जगभरात चर्चा होत आहे. काय म्हणाले माछर या घटनेत जखमी झालेले पायलट स्मित माछर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मला पाठिंबा दिला आणि प्रेम व प्रोत्साहनाचे संदेश पाठवले, त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझे भारतीय सहकारी, सह-कर्मचारी, प्रवासी, विमान कर्मचारी आणि जगभरातून ज्यांनी या कठीण काळात मला साथ दिली, त्या सर्वांचे मनापासून आभार. एक वैमानिक म्हणून मी केवळ माझे कर्तव्य बजावत होतो. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्वजण सुरक्षित आहेत, याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याचे महत्त्व शब्दांत सांगता येणार नाही, ते माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. दरम्यान, ही पोस्ट स्मित माछर यांच्या अधिकृत खात्यावरून आहे की अन्य कोणाचे हे खाते आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांसह कौतुकाचा वर्षाव या धाडसी कामगिरीबद्दल देशभरातून कॅप्टन स्मित माछर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमच्या मुंबईचा सुपुत्र आणि एक खरा हिरो – कॅप्टन स्मित माछर याचा मनापासून अभिमान वाटतो, ज्याने अत्यंत अपवादात्मक आणि असाधारण रीतीने शेकडो लोकांचे प्राण वाचवले! भयंकर दुखापत झालेली असतानाही, दुबईहून इस्रायलकडे जाणाऱ्या प्रवासादरम्यान स्मितने दाखवलेले प्रसंगावधान आणि धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. या कठीण परिस्थितीत त्वरित एक टीम म्हणून काम करणाऱ्या सर्व प्रवाशांनाही मी सलाम करतो. हीच भारतीय शौर्याची खरी ओळख- चव्हाण मंत्री रवींद्र चव्हाण म्हटले की, संकट कितीही मोठं असलं, तरी कर्तव्यापासून मागे न हटता स्वत:पेक्षा इतरांच्या जीवाला प्राधान्य देऊन शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं, हीच भारतीय शौर्याची खरी ओळख आहे. कॅप्टन स्मित माछरयांनी आपल्या धाडसातून संपूर्ण जगाला शौर्याचं दर्शन घडवलं आहे. भारतभूमीने दिलेल्या संस्कारांतून घडलेला हा धैर्याचा संस्कार आज जगाने अनुभवला आहे. कॅप्टन स्मित माछरयांच्या अदम्य धैर्याला आणि कर्तव्यनिष्ठेला मनःपूर्वक सलाम! 7 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या, विमानात काय-काय घडले 1. आधी आपत्कालीन स्थिती, त्यानंतर अपहरणाचा अलर्ट विमानाने प्रथम 7700 कोड पाठवला. याचा अर्थ विमानात काहीतरी आपत्कालीन परिस्थिती आहे. काही सेकंदांनंतर विमानाने 7500 कोड पाठवला. हा कोड विमानाच्या अपहरणासाठी असतो. 2. विमान एका मिनिटात 17 हजार फूट खाली आले फ्लाइट रडारनुसार, विमान अवघ्या दोन मिनिटांत 34 हजार फूटांवरून 16,600 फूट उंचीवर आले. त्यानंतर विमानाने आपला मार्ग बदलला आणि सौदी अरेबियातील तबूकच्या दिशेने निघाले. सकाळी सुमारे 10:50 वाजता विमान वायव्य सौदी अरेबियावर असताना अवघ्या दोन मिनिटांत 17,400 फूट खाली आले. त्याची उंची 34,000 फूटांवरून कमी होऊन सुमारे 16,600 फूट राहिली.
सकाळी सुमारे 10:50 वाजता विमान वायव्य सौदी अरेबियावर असताना अवघ्या दोन मिनिटांत 17,400 फूट खाली आले. त्याची उंची 34,000 फूटांवरून कमी होऊन सुमारे 16,600 फूट राहिली. 3. कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये भांडण झाले प्राथमिक माहितीनुसार, विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट आणि सहपायलट यांच्यात भांडण झाले होते. याचदरम्यान विमानातून आपत्कालीन सिग्नल पाठवण्यात आले. मात्र, दोघांमधील भांडण नेमक्या कोणत्या कारणावरून सुरू झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 4. प्रवाशांनी कॉकपिटमध्ये घुसून हल्लेखोराला रोखले इस्रायली माध्यमांच्या वृत्तांमध्ये प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने दावा करण्यात आला की, एका वैमानिकाने विमान जमिनीच्या दिशेने वळवून ते क्रॅश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा वाद सुरू झाला. विमान खाली येऊ लागले तेव्हा पुढे बसलेले काही इस्रायली प्रवासी कॉकपिटच्या दिशेने धावले. त्यांनी हल्लेखोर वैमानिकाशी झटापट करून त्याला कॉकपिटमधून बाहेर काढले. प्रवाशाच्या म्हणण्यानुसार, विमानात साध्या कपड्यांमध्ये आणखी दोन वैमानिकही उपस्थित होते. त्यापैकी एका वैमानिकाने विमानाचा ताबा घेतला. 5. जखमी वैमानिकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न मिरियम नावाच्या एका प्रवाशाने सांगितले की, तिने कॉकपिटमधून किंचाळण्याचे आवाज ऐकले होते. दरवाजा उघडल्यानंतर तिला एक पायलट जखमी अवस्थेत दिसला. त्याच्या हातात फोल्डिंग चाकू होता आणि सर्वत्र रक्त सांडलेले होते. एका प्रवाशाच्या म्हणण्यानुसार, चाकूने जखमी झालेल्या पायलटची प्रकृती गंभीर होती. विमानात उपस्थित असलेल्या एका इस्रायली दंतवैद्याने त्याच्यावर उपचार केले आणि त्याचा जीव वाचविण्यात मदत केली. 6. इस्रायलने फायटर जेट्स पाठवले, ताबुकमध्ये लँडिंग हायजॅकचा इशारा मिळाल्यानंतर इस्रायली हवाई दलाने फायटर जेट्स पाठवले आणि देशातील सुरक्षा सतर्कता वाढवण्यात आली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर लँडिंग करण्यात आली. इस्रायलने काही काळासाठी आपली हवाई हद्दही बंद केली होती. 7. इस्रायलमध्ये प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात, दहशतवादी हल्ल्याचा दावाही जेरुसलेम पोस्टनुसार, इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणा या घटनेकडे संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टिकोनातूनही पाहत आहेत. प्राथमिक चौकशीत ज्या पायलटवर हल्ला केल्याचा आरोप आहे, तो ओमानचा नागरिक असल्याचे समोर आले आहे.
Source link
दुबईहून इस्रायलकडे जाणाऱ्या विमानात थरार:स्मित माछर म्हणाले- मी फक्त माझे कर्तव्य बजावले, तुमच्या प्रार्थनांमुळेच वाचले प्राण