![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. देशातील वाढती महागाई, तेलाचे दर, परराष्ट्र धोरण, मतदारयादीतील कथित घोळ तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. कर्मवीर जयंतीनिमित्त कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार यांनी देशातील महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे लक्ष महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा इतर गोष्टींकडे अधिक असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशात तेलाचे दर आणि परराष्ट्र धोरणासारखे महत्त्वाचे विषय असताना त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारयादीतील नोंदींवरून निवडणूक आयोगावर सवाल मतदारयादीतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपासून आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंत मतदारयादीत अनेक त्रुटी असल्याचे म्हटले. विधानसभा मतदारयादीत परराज्यातील विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट असल्याचा दावा त्यांनी केला. या विद्यार्थ्यांनी मतदान केल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीतील काही नोंदींचाही त्यांनी उल्लेख केला. ‘वडील’ आणि ‘बॉम्ब’ अशा स्वरूपाच्या नावांच्या नोंदी समोर आल्याचा दावा करत त्यांनी या प्रकारावर प्रश्न उपस्थित केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात अशा प्रकारचा घोळ होत असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. मतदारयादीतील या त्रुटींसाठी जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मतदारयाद्या व्यवस्थित होईपर्यंत निवडणूक आयोगावरील विश्वासाचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असताना निवडणुका घेण्याची घाई का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बॅलेट पेपरच्या मागणीवरून इंडिया आघाडीचे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेणे, या मागण्यांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. येत्या 4 ऑक्टोबरला इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मुंबईत एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या घटकांना आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राम शिंदेंच्या जिल्हा बँक निवडणूक अर्जावरून टीका भाजप नेते राम शिंदे यांच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरूनही रोहित पवार यांनी टीका केली. राम शिंदे यांना तीन अपत्ये असतानाही ते जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याचा दावा त्यांनी केला. राम शिंदे हे विधानपरिषद सभापती असून ते महत्त्वाच्या संवैधानिक पदावर आहेत. अशा परिस्थितीत नियमांचा विचार करूनच निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे, असे रोहित पवार यांनी म्हटले. राम शिंदे यांच्या बौद्धिक क्षमतेवरही त्यांनी बोचरी टीका केली. त्यांच्या संवैधानिक पदाच्या कार्यालयातही जणू ‘बौद्धिक दुष्काळ’ असल्याचा टोला त्यांनी लगावला. नियम डावलून अर्ज दाखल करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. केवळ आपला राजकीय विरोधक म्हणून राम शिंदे यांना ताकद दिली जात असेल, तर त्याचा महाराष्ट्राला मोठा फटका बसेल, असेही रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राम शिंदे यांच्यावर टीका करताना ‘उत्सव समितीत संधी द्या’ असा खोचक सल्लाही दिला. हेही वाचा… SIR प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे वगळल्याचा आरोप:राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन; राष्ट्रपतींना निवेदन, आयुक्तांच्या चौकशीची मागणी मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पुणे शहर शाखेने गुरुवारी (1 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन देऊन एसआयआर प्रक्रियेबाबत विविध मागण्या करण्यात आल्या. सविस्तर वाचा….
Source link
रोहित पवारांची केंद्र-राज्य सरकारवर टीका:मतदारयादीतील घोळावरून निवडणूक आयोगावर निशाणा