![]()
जिल्ह्यात मागील ६० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, ६ लाख हेक्टरवरील खरीप पिके शेतातच वाळून गेली असल्याने शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आता प्रशासनाकडून गंगापूर, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, पैठण, वैजापूर, फुलंब्री आणि सिल्लोड या आठही तालुक्यांमध्ये पीक नुकसानीच्या प्रत्यक्ष पंचनाम्यांना युद्धपातळीवर सुरुवात केली असून, जवळपास ३५० पथके या कामात व्यस्त आहेत. आठवडाभरात पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासनाकडे सादर करण्यात येणार असून, दिवाळीपू्र्वी मदत मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांची विशेष संयुक्त पथके तयार करण्यात आली असून, ती थेट शेतावर जाऊन पाहणी करत आहेत. सातबाऱ्यावरील नोंद, प्रत्यक्ष शेतातील पीक, बाधित क्षेत्र आणि नुकसानीची टक्केवारी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त याची काटेकोर नोंद पंचनाम्यात घेतली जात आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी शेतकरी आणि ५ पंचांच्या स्वाक्षऱ्यांसह अर्ज भरून घेतले जात आहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने कपाशी, मका, सोयाबीन, तुरीचे पीक हातून गेले आहे. दरम्यान, फुलंब्री तालुक्यातील ९२ गावांमध्ये महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागाची विशेष पथके बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ५ मंडळ अधिकारी व ४ विस्तार अधिकाऱ्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. कन्नड : २०८ गावांमध्ये २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त तालुक्यातील २०८ गावांमध्ये सुमारे १ लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. तहसीलदार सारिका भगत यांनी बैठक घेऊन ५८ ग्राम महसूल अधिकारी, ३७ कृषी सहाय्यक, १० मंडळ अधिकारी आणि ८५ ग्रामसेवकांना दिरंगाई न करता तातडीने अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. सोयगाव : ८ दिवसांमध्ये काम पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश तालुक्यात ४२,४८५ हेक्टरवरील पिके दुष्काळाच्या सावटाखाली आली आहेत. २२ तलाठी, ३२ ग्रामपंचायत अधिकारी आणि १७ कृषी सहाय्यक अशा ७१ अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज मैदानात उतरवण्यात आली आहे. तालुक्यातील गावनिहाय पाहणी करून पुढील ८ दिवसांत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. खुलताबाद : ३५ हजार हेक्टरवरील पिकांचा पंचनामा करण्यात येणार तालुक्यातील ७३ गावांत गुरुवारपासून पंचनाम्याला सुरुवात झाली. ३५ हजार हेक्टरवरील मका, कापूस, सोयाबीन, तूर व अद्रकाचे पीक करपले आहे. पंचनाम्यासाठी २५ तलाठी, २१ कृषी सहाय्यक, १६ ग्रामसेवक नियुक्त आहे. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड व तहसीलदार संतोष गुट्टे यांनी सराई परिसरात पाहणी केली. गंगापूर : ६८ तलाठी आणि १२ मंडळ अधिकारी तैनात तालुक्यात ८९,५४७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली होती. मात्र, पावसाच्या अभावाने ८० टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने १ ऑक्टोबरपासून ६८ तलाठी आणि १२ मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करून पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे नाव, ७/१२ उतारा, ८-अ, आयडी, बँक खाते आदी माहिती गोळा केली जात आहे. वैजापूर : १६४ गावांत पीक पंचनाम्यांना झाली सुरुवात तालुक्यातील १६४ गावांमध्ये १ ऑक्टोबरपासून संयुक्त पथकांकडून पाहणी सुरू झाली आहे. शेतातील प्रत्यक्ष पीक आणि सातबाऱ्यावरील नोंदींची पडताळणी केली जात आहे. तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी दररोजचा पंचनामा प्रगती अहवाल थेट तहसीलदारांकडे सादर करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी दिले आहेत. सिल्लोड : तालुक्यात दोन दिवसांत १०% काम पूर्ण तालुक्यात दुष्काळामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारच्या आदेशानंतर महसूल व कृषी यंत्रणेने वेगाने काम सुरू केले असून दोन दिवसांत १० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊनच पंचनामा करण्याचे स्पष्ट निर्देश तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आहेत.
Source link
8 तालुक्यांत 350 पथकांद्वारे पिकांचे पंचनामे:कृषी, महसूल विभागाकडून शेतातच पीक नुकसानीसह बँकेच्या माहितीचे संकलन