![]()
अत्यल्प पर्जन्यमानामुळे उदगीर तालुक्यात शेती पिकांवर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या विहित निकषांनुसार मदत व लाभ मिळण्यासाठी पंचनामे अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याच्या सूचना प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, उदगीर यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाहणीदरम्यान संबंधित पिकांची सद्यस्थिती, नुकसानीचे स्वरूप, बाधित क्षेत्र तसेच पंचनाम्यासाठी आवश्यक असलेल्या इतर माहितीची अचूक नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले. शासनाच्या विहित निकषांनुसार पंचनाम्याची कार्यवाही पारदर्शक व अचूक पद्धतीने पूर्ण करून कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पंचनाम्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती शासनास सादर करण्यासाठी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाची यंत्रणा समन्वयाने काम करणार आहे. बैठकीस तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी संदीप वलकुंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Source link
उदगीरमध्ये पीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरूवात:महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना