महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. MPSC च्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करायची असेल, तर संबंधित व्यक्ती पदावर असताना
.
MPSCच्या विविध परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींवरून गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MPSC विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यानंतर सरकारकडून आयोगाच्या कारभाराबाबत न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचेही आश्वासन देण्यात आले होते.
‘पदावर असताना चौकशी कशी होणार?’
सतेज पाटील यांनी MPSC आंदोलनावर भाष्य करताना CBT पद्धती, विविध परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा उल्लेख केला. मुख्यमंत्री स्वतः न्यायालयीन चौकशीचे आश्वासन देत असतील, तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेल्याचे दिसते, असे ते म्हणाले.
‘ते त्या पोस्टवर असल्यावर चौकशी कशी होणार? तुम्ही त्यांची ट्रान्सफर कुठंतरी करा आणि मग न्यायालयीन चौकशी करा. त्यातून दूध का दूध, पाणी का पाणी होईल,’ असे सतेज पाटील यांनी म्हटले.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न?
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सतेज पाटील यांनी सरकारवर आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. आंदोलन सुरू असताना त्याच मुद्द्यांवर वेगळे आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला.
लोकशाही व्यवस्थेत एखाद्या आंदोलनातील मुद्दा योग्य वाटत असेल, तर सत्ताधारी पक्षातील व्यक्तीलाही त्या आंदोलनाला पाठिंबा देता येतो. मात्र, आंदोलनात फूट पाडून वेगळे आंदोलन उभे करणे योग्य नसल्याचे पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, पुण्यात MPSCच्या प्रश्नांवर एकाच काळात दोन वेगवेगळी आंदोलने सुरू झाल्याचे समोर आले. एका आंदोलनात MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, तर दुसऱ्या आंदोलनात परीक्षेच्या पद्धतीशी संबंधित मागण्या करण्यात आल्या.
‘विद्यार्थी या प्रयत्नांना बळी पडणार नाहीत’
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा कायम असल्याचेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केवळ शिष्टमंडळाशी चर्चा करून थांबण्याऐवजी सरकारने प्रत्यक्ष निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
‘MPSCचे विद्यार्थी-विद्यार्थिनी याला बळी पडणार नाहीत आणि जो मुद्दा आहे, त्या मुद्द्याला धरून जे आंदोलन चाललंय, त्याला काँग्रेस पक्षाचा तर पाठिंबा सातत्याने राहिलेलाच आहे,’ असे पाटील म्हणाले.
सरकारकडून सचिवांची बदली, चौकशीचे आश्वासन
दरम्यान, विद्यार्थ्यांसोबतच्या बैठकीनंतर सरकारने MPSCच्या सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी हरपाळकर यांची बदली करण्यात आली. सरकारकडून त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
MPSCच्या विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसेच सदस्यांवरील आरोपांची न्यायालयीन चौकशी तीन महिन्यांत करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. यासोबतच आगामी MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.
अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली झाल्यानंतर आता MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या भूमिकेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये अध्यक्षांच्या राजीनाम्याचाही समावेश आहे.
मात्र, MPSC अध्यक्ष हे घटनात्मक पद असल्याने त्यांना हटवण्याची प्रक्रिया सचिवांच्या बदलीपेक्षा वेगळी आहे. अध्यक्षांच्या पदाबाबत घटनात्मक तरतुदींनुसार प्रक्रिया होणे आवश्यक असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे सचिवांची बदली झाल्यानंतर आता न्यायालयीन चौकशी नेमकी कशी होते, तिचा अहवाल किती कालावधीत येतो, आगामी परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील MPSCच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…
महाराष्ट्रातील दुष्काळाचे भयाण वास्तव:करपलेली पिके अन् डोळ्यांत हतबलतेचे अश्रू! अकोल्यात दुष्काळाचे अत्यंत भयाण वास्तव

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसत असेल, तर तो जगाच्या पोशिंद्याला. सध्या महाराष्ट्रात दुष्काळाचे अत्यंत भयाण वास्तव समोर येत असून, अकोला जिल्ह्यातील चित्र काळीज पिळवटून टाकणारे आहे. काळ्या आईची सेवा करण्यासाठी अहोरात्र घाम गाळणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांत आज केवळ आणि केवळ हतबलतेचे अश्रू आहेत. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या पदरी यंदाही घोर निराशाच पडली असून, निसर्गाच्या या अवकृपेमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत विदारक बनली आहे. सविस्तर वाचा…