![]()
राज्यात शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करत असतानाच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ९३,२६८ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जखाती निरंक झाली असून, त्यांना नव्या हंगामासाठी पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, केवळ ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) बाकी असल्याने तब्बल २३,२८७ (२४.९६ टक्के) शेतकऱ्यांना अद्याप या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून एकूण १ लाख ९० हजार ७०१ शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली होती. शासनाने आतापर्यंत जाहीर केलेल्या ३ टप्प्यांमध्ये ९३ हजार २६८ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. अशी करा ई-केवायसी १. यादी कुठे पाहावी : कर्जमाफीच्या याद्या जिल्ह्यातील सर्व बँक शाखा, विविध कार्यकारी सोसायट्या, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय व आपले सरकार सेवा केंद्रांवर प्रसिद्ध केल्या आहेत. २. यादीत नाव तपासणे: लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रथम या यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी.
३. आवश्यक कागदपत्रे: यादीतील नोंदणी क्रमांक, मूळ आधार कार्ड आणि बँक बचत खात्याचे पासबुक सोबत ठेवावे.
४. प्रमाणीकरण: आपले सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) पूर्ण करून घ्यावे. शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात वेळेत आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. तीन टप्प्यांत ६९८ कोटींचा लाभ मिळाला असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. – समृद्ध जाधव, जिल्हा उपनिबंधक
Source link
केवायसीअभावी 25 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही:संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 93,268 शेतकरी कर्जमुक्त