Headlines

लासलगाव रेल्वे स्थानकावर ‘वायर रोप’चा फास:दुचाकी लावल्यास 500 रुपये दंड, प्रवाशांना सोडवण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर आरपीएफची दंडात्मक कारवाई‎




येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडविण्यासाठी तसेच तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या दुचाकींना आरपीएफ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वायर रोप लावून ५०० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज होणाऱ्या या कारवाईमुळे रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी वैतागले असून ही कारवाई थांबवण्याची मागणी होत आहे. रेल्वे स्थानकावर जवळपास १० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या थांबतात. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. गेल्या दोन महिन्यांपासून प्रवाशांना सोडविण्यासाठी तसेच रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या दुचाकींना थेट वायर रोप लावला जात आहे. त्यानंतर गाडी सोडविण्यासाठी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे प्रवासी वैतागले असून दररोजच्या या त्रासामुळे रेल्वेने प्रवास करायचा की नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. दरम्यान, दररोज होत असलेल्या या त्रासाबाबत अनेक प्रवाशांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, या संदर्भात तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आरपीएफ अधिकाऱ्याची तक्रार करून त्यांची बदली करण्यासंदर्भात पत्रव्यवहार कदम यांना दिलेली दंडाची पावती करणार असल्याची माहिती दिली आहे. बस आणि इतर खासगी वाहनांना जास्त प्रवासभाडे लागत असल्याने अनेक गोरगरीब प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, लासलगाव रेल्वे स्थानकावर दुचाकी आणि चारचाकी घेऊन येणाऱ्या प्रवाशांना अतिशय वाईट अनुभव येत असल्याने संतापाचे वातावरण आहे. लासलगाव रेल्वे स्थानकावरून नाशिक येथे जाण्यासाठी रेल्वे तिकीट ५० रुपये आहे. मात्र, प्रवाशांना सोडवण्यासाठी किंवा तिकीट काढण्यासाठी स्थानकावर आलो, तर वाहनाला ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे.यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. लासलगाव रेल्वे स्थानकावर तपोवन एक्स्प्रेसला मुलीला सोडायला गेलो होतो. दुचाकी पाच मिनिटे लावली. मुलीला स्टेशनवर सोडून येईपर्यंत माझ्यावर दंडात्मक कारवाई करून ५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने देण्यास सांगितले. हे अत्यंत चुकीचे असून रेल्वेने प्रवास करणे बंद करणार आहोत.- नारायण कदम, प्रवासी रेल्वे स्थानकावर अमृत भारत योजनेतून अनेक चांगली कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वेकडे प्रवाशांची ओढ निर्माण व्हावी, हा उद्देश आहे. मात्र, स्थानकावर आरपीएफकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याने अनेक प्रवासी अमृत भारत योजनेतून मिळणाऱ्या सुविधांपासून लांब जाऊ लागले आहेत. रेल्वेला उत्पन्न मिळत नसल्याने अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. आता उत्पन्न देणाऱ्या प्रवाशांनाच अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *