![]()
युवकांनी आयुष्यात येणाऱ्या अडचणींना न घाबरता धैर्याने, संयमाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जावे. उपलब्ध संधींचा उपयोग करून स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांनी केले. पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती उपसभापती संजय लगाने, उदयसिंह काळे आणि सतीश शेळके यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना शिवराज भुमरे पुढे म्हणाले की, सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत युवकांनी खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. समस्यांचे स्वरूप समजून घेऊन त्यावर योग्य मार्ग शोधावा. युवकांमधील प्रचंड ऊर्जा आणि जिद्द यांचा वापर उज्ज्वल भविष्यासाठी करावा. तसेच एकमेकांना सहकार्य करण्याची भावना जोपासावी. या कार्यक्रमात परिसरातील युवकांनी शिवराज भुमरे यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा मांडल्या. भुमरे यांनी या सर्व प्रश्नांची गंभीर दखल घेत योग्य निराकरण करण्याचे आश्वासन दिले. या थेट संवादामुळे युवकांना मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, युवा ही देशाची खरी ताकद आहे. शिक्षणासोबतच युवकांनी सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि शिस्त जोपासली पाहिजे. राष्ट्रनिर्मितीसाठी आणि आदर्श समाज घडवण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ह. सो. बिडवे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. संतोष चव्हाण यांनी केले.
Source link
मार्गदर्शन:पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात ‘युवा संवाद’ कार्यक्रमाला प्रतिसाद