Headlines

रोहित पवार यांचे एमपीएससी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन सुरू:देशभरातून पाठिंबा मिळेल; सरकारला राजकीय किंमत मोजावी लागेल, पवारांचा इशारा




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून होणाऱ्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि पैशांच्या जोरावर अधिकारी बनविण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप करीत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. एमपीएससीचा माझ्या कुटुंबाला कोणताही वैयक्तिक फायदा नाही. माझ्या मुलांनाही एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे नाही. मात्र, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलो आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. एमपीएससीच्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. त्यामुळे या संस्थेतील गैरप्रकार गंभीर असून, भ्रष्ट अधिकारी प्रशासनात नकोत. पेपरफुटीमुळे राज्यातील विद्यार्थी अस्वस्थ आहेत. त्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला निश्चित यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पाठिंबा मिळेल, असा दावा पवार यांनी केला. सत्ताधाऱ्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविता येत नसल्याने आंदोलनावर आरोप केले जात आहेत. मात्र, त्याला उत्तर देऊन आंदोलनाची पातळी खालावणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसमोर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. आंदोलन लांबले तर एमपीएससीच्या अध्यक्षांना कोण वाचवत आहे, असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे सरकारने विलंब न करता निर्णय घ्यावा, अशी मागणी पवार यांनी केली. सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिल्याने हे आंदोलन अराजकीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलन स्वच्छ, प्रामाणिक आणि जबाबदारीने सुरू असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही येथे यावे लागेल, असे पवार म्हणाले. आंदोलन लांबले तर सरकारला त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *