“राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता शासकीय यंत्रणांना कोणतीही सुट्टी न घेता युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यात 44 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, येत्या 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के काम पूर्ण होईल. केंद
.
दुष्काळी पंचनाम्यांचा वेग वाढवला; 12 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होणार
पंचनाम्यांच्या सद्य:स्थितीची अधिकृत आकडेवारी मांडताना कृषिमंत्री म्हणाले, “राज्यातील बाधित 1 कोटी 49 लाख हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत सरासरी 44 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 68 टक्के, अमरावतीत 55 टक्के, पुण्यात 30 टक्के आणि नागपूर विभागात 25 टक्के काम झाले आहे.”
अधिकाऱ्यांना सुट्ट्या बंद
“10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे 100 टक्के पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एखाद-दुसरा दिवस मागे-पुढे झाला तरी अहवाल तातडीने तयार करून केंद्राकडे पाठवला जाईल.”

सॅटेलाइट सर्वेक्षणातील मर्यादा
“वरवर पाहता किंवा उपग्रहावरून शेत हिरवे दिसत असले, तरी प्रत्यक्षात पावसाअभावी शेंगांमधील दाणे भरलेले नाहीत आणि पिकांची वाढ खुंटलेली आहे. हे वास्तव केंद्रीय पथकासमोर मांडले जाईल. केंद्रीय पथक दोन दिवसांत पाहणीसाठी राज्यात येत असून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना भरीव मदत देईल.”
आणखी 19 तालुक्यांचा समावेश; दोनऐवजी तीन हेक्टरच्या मदतीवर विचार
दुष्काळी यादीतून सुटलेल्या तालुक्यांबाबत विचारले असता भरणे यांनी स्पष्ट केले, “महाबळेश्वर, पाटणसारख्या तालुक्यांसोबतच दुष्काळी पट्ट्यातील कोरेगाव, जावळी किंवा इतर ज्या भागात पिके पूर्णपणे जळून पिवळी पडली आहेत, अशा भागांचा ग्राउंड रिपोर्ट मागवण्यात आला आहे. त्यानुसार आणखी १९ तालुक्यांचा समावेश वाढीव यादीत केला जात असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे.”
“सध्या दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा नियम आहे. मात्र, शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत द्यायची झाल्यास वरचा वाढीव भार राज्य शासन स्वतः उचलेल. यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील.”
‘कॅबिनेटमध्ये शीतयुद्ध’ असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळला
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बोलचाल नसल्याचा केलेल्या आरोपावर कृषिमंत्री म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आजचा काळ शेतकऱ्यांच्या अडचणीचा आणि त्यांचे अश्रू पुसण्याचा आहे, त्यामुळे कोणीही यावर राजकारण करू नये. त्यांनी योग्य सूचना कराव्यात, आम्ही त्याची दखल घेऊ.”
महायुतीत सर्वकाही आलबेल
“कॅबिनेटमध्ये कोणी कोणाशी बोलत नाही, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. सरकारमध्ये १०० टक्के आलबेल आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीचे सर्व मंत्री बळीराजाच्या संकटात पूर्णपणे एकसंध आहेत.”
चारा टंचाईवर मात: वैरण विकास कार्यक्रम सुरू
दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याच्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती दिली. “पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा या दोन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे यांच्या विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर ‘वैरण विकास कार्यक्रम’ हाती घेण्यात आला असून शेतकऱ्यांना चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.”
महिला शेतकरी धोरण: 20 दिवसांत 33 लाख अर्ज दाखल!
महाराष्ट्र शासनाने आणलेल्या ऐतिहासिक महिला शेतकरी धोरणाविषयी सांगताना ते म्हणाले, “17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मोहिमेत अवघ्या 20 दिवसांत राज्यभरातून तब्बल 33 लाख महिलांनी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्रा’साठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातून सर्वाधिक 2 लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.”
सातबारा नसलेल्या महिलांनाही अधिकार
“524 ग्रामसभांमधून आतापर्यंत 40 हजार महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. ज्या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा नाही, मात्र त्या शेतात किंवा शेतीपूरक व्यवसायात राबतात, अशा सर्व शेतमजूर व कष्टकरी महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”
विधान परिषद निवडणूक- “महायुती म्हणून एकत्र लढणार, बंडखोरी शमवू”
पुणे पदवीधर मतदारसंघावरून राष्ट्रवादीवर अन्याय झाल्याच्या चर्चेवर कृषिमंत्री म्हणाले, “अरुण लाड यांच्या सुपुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ती जागा भाजपच्या वाट्याला गेली. चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नक्कीच मागणी केली होती आणि पक्षाकडे सक्षम उमेदवारही होते; मात्र आघाडी धर्माचे पालन करत मराठवाड्यात सतीश चव्हाण यांच्यासाठी मित्रपक्षांनी सहकार्य केले, तर पुण्यात आम्ही भाजपच्या पाठीशी उभे राहिलो आहोत.”
बंडखोरीवर तोडगा
“पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी भरलेल्या अर्जावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत सर्व इच्छुकांची समजूत काढली जाईल आणि महायुती एकदिलाने ही निवडणूक जिंकेल.” तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, “रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर आणि आंदोलनावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घेतील,” असे शेवटी स्पष्ट केले.
—————————————————–
हेही वाचा….
पंचनाम्यांच्या नावाखाली क्रूर चेष्टा बंद करा: दुष्काळात शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये सरसकट मदत द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल – मनोज जरांगे

“राज्यात यंदा अस्मानी संकटाने थैमान घातले असून शेतात उभा असलेला खरीप पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मात्र, सरकारचे मंत्री गळ्यात लांबलचक टाय, डोळ्यांवर महागडे चष्मे आणि अत्तराचे घमघमाट मारून दुष्काळी बांधावर येत आहेत. मंत्र्यांचे हे दौरे म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणे आणि त्यांच्या उरावर नाचण्यासारखे आहे. एका बाजूला शेतकरी उघड्यावर पडलाय आणि दुसऱ्या बाजूला अधिकारी बांधाच्या केवळ अलीकडचा कोपरा जळाला म्हणून तेवढाच पंचनामा करत आहेत. दुष्काळात तुकड्या-तुकड्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांची थट्टा करू नका; हेक्टरी 1 लाख रुपये आणि संपूर्ण सरसकट कर्जमाफी तत्काळ जाहीर करा, अन्यथा एका महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे महाआंदोलन उभे राहील,” असा कडक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी