.

ऑक्टोबर म्हणजे हलकी थंडी आणि गुलाबी गारवा… पण यंदा अहिल्यानगरमध्ये चित्रच उलटे आहे. गेल्या वर्षी संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमानाचा पारा ३१ अंशांच्या पुढे गेला नव्हता; यंदा मात्र ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे. अवघ्या आठ दिवसांत पारा तब्बल ८ अंशांनी वाढून गुरुवारी ३७ अंशांवर पोहोचला. त्यामुळे शहरात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांची लाहीलाही होत आहे. शुक्रवारी व शनिवारी कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला शहराचे कमाल तापमान ३०, तर किमान तापमान २१ अंश नोंदले गेले होते. यंदा याच दिवशी कमाल तापमान ३७, तर किमान तापमान २३ अंशांवर पोहोचले आहे. पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांकडून उन्हापासून बचावासाठी टोपी, छत्री तसेच थंड पेयांचा आधार घेतला जात आहे.
परतीचा पाऊसही हुलकावणी देणार? यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा सुमारे ३० टक्के पाऊस कमी झाल्याने जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. ३० सप्टेंबरला मान्सूनने अधिकृत माघार घेतली. त्यानंतर १ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, ऑक्टोबरचे पहिले आठ दिवस पूर्णपणे कोरडे गेले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने परतीच्या पावसाची चिन्हे कमी आहेत. दक्षिण भारतात तयार होत असलेल्या नव्या चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता असली तरी ती केवळ ५ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
^सध्या आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडत आहेत. त्यातच कमी पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने तापमानाबरोबर उष्णतेची तीव्रताही वाढली आहे. दरवर्षी ऑक्टोबर हीट असते; मात्र यंदा तिची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील आठवड्यात रात्र सुमारे २५ मिनिटांनी मोठी आणि दिवस २५ मिनिटांनी लहान होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा प्रभावही कमी होईल. -बी. एन. शिंदे, हवामानतज्ज्ञ