![]()
‘समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सामाजिक समरसता, एकता आणि सांस्कृतिक जागृती अधिक बळकट करण्याची गरज असून, धर्म, समाज आणि राष्ट्रसेवेचा संकल्प घेऊन कार्यकर्त्यांनी सातत्याने कार्यरत राहावे,’ असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख वक्ते अटल पांडे यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त लोहाना महाजन वाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी धर्म, संस्कृती, सामाजिक समरसता आणि हिंदू समाजाच्या संघटनात्मक भूमिकेवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठ, तीर्थक्षेत्र सोनारखेड, भक्तिसुधा विश्व कल्याण सेवा समितीचे प्रीतम उर्फ पांडुरंग महाराज झोंबाडे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल साहू आणि मातृशक्ती प्रमुख सुमुद्रा काळे पोद्दार यांची प्रमुख उपस्थिती होती. पांडे यांनी धार्मिक आणि सामाजिक आव्हानांबाबत व्यापक जनजागृती करणे, धर्मांतरासारख्या हालचालींबाबत समाजात चेतना निर्माण करणे, सामाजिक समरसतेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणे ही आजच्या काळाची गरज असल्याची भावना स्पष्ट केले. रामजन्मभूमी आंदोलनाचाही घेतला आढावा ः रामजन्मभूमी आंदोलनाचा संदर्भ देताना अटलजी पांडे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीचा उल्लेख केला. दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिराची निर्मिती हा हिंदू समाजाच्या श्रद्धा, ऐतिहासिक जनआंदोलनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाच्या काळात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्यांनी घरोघरी जनजागृतीचे कार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. इतिहासातील विविध आव्हानांनंतरही भारताची संस्कृती, समृद्ध परंपरा टिकून राहिली. आजच्या तरुण पिढीने देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि धर्म समजून घेत समाज व राष्ट्राप्रती असलेली नैतिक जबाबदारी ओळखावी, असे आवाहन केले. ‘आपली शक्ती आपली एकता, ओळख आपली संस्कृती ’ कार्यकर्त्यांना आवाहन करताना अटलजी पांडे म्हणाले, आपली शक्ती आपली एकता आहे, आपली ओळख आपली संस्कृती आहे आणि आपला संकल्प धर्म, समाज व राष्ट्राची सेवा आहे. आपल्याला समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सामाजिक समरसता आणि एकता मजबूत करण्यासाठी सतत कार्यरत राहायचे आहे,असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा मंत्री विजय खंडसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बजरंग दल सहसंयोजक निखिल विश्वकर्मा यांनी मांडले, तर आभार प्रा. योगिता कळंबे यांनी मानले. या प्रसंगी शरद अग्रवाल, नितीन राजवैद्य, बंटी पारवानी, सिद्धू सोलंके, त्रिंदेव डेडवाल, संघटन मंत्री विशाल खंडसे, बजरंग दल संयोजक सतीश कुरील यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व मातृशक्तीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Source link
एकता, संस्कृती, सेवा हाच समाज संघटनेचा संकल्प- अटल पांडे:विश्व हिंदू परिषद स्थापना दिनानिमित्त लोहाना महाजन वाडी येथे सोहळा