![]()
येथील ग्रामीण रुग्णालयात १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान नोंद झालेल्या १,००० ओपीडी रुग्णांपैकी १७५ जणांना थंडी-तापाची लक्षणे आढळली. शहरातील तुंबलेली गटारे आणि सांडपाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा उपद्रव वाढला असून, डेंग्यू तपासणीची सुविधा नसल्याने नागरिकांनी डास निर्मूलनासाठी तातडीने फवारणी करण्याची मागणी केली आहे. पावसानंतर बदललेले हवामान आणि वाढत्या उकाड्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना थंडी, ताप, सर्दी, खोकला आणि व्हायरल संसर्गाचा त्रास होत आहे. त्यामुळे खासगी दवाखाने आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळांमधील तुंबलेली गटारे तसेच सांडपाण्याची डबकी डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरत आहेत. कूलरच्या पाण्याच्या ट्रेमध्येही डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. नियमित धूरफवारणी आणि जंतुनाशक फवारणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ग्रामपालिकेने सांडपाण्याची डबकी आणि तुंबलेल्या गटारांची स्वच्छता करून डास निर्मूलनासाठी तातडीने फवारणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.डासांची पैदास रोखण्यासाठी परिसरातील स्वच्छता आणि सांडपाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. नागरिकांनी घराजवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कूलरच्या पाण्याच्या ट्रेमधील पाणी नियमित बदलावे. ग्रामपालिकेने तुंबलेली गटारे आणि सांडपाण्याच्या डबक्यांची स्वच्छता करण्यावर भर द्यावा. तसेच, डास निर्मूलनासाठी नियमित फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्लेटलेट्स कमी होण्याचे रुग्णही वाढत आहेत. कळवण येथे डेंग्यू व चिकनगुनिया तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांचे निदान लवकर होऊ शकेल. – डॉ. हिरामण गांगोडा , वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, अभोणा. रुग्णालयात डेंग्यू तपासणीची सुविधा नाही, तर मलेरिया व चिकनगुनियाच्या तपासण्या नाशिक येथे कराव्या लागतात. टायफॉइडची लक्षणे असलेल्या आणि चार-पाच दिवसांत बरे न होणाऱ्या रुग्णांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जाते.
Source link
आरोग्य संकट:अभोण्यामध्ये डासांचा उपद्रव; सात दिवसांत 175 थंडी-तापाचे रुग्ण