Headlines

सिन्नर-शिर्डी महामार्गावर रात्री वाहने अडवून लुटणारी चौघांची टोळी जेरबंद:पहाटे दर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्याला शस्त्रांचा धाक; चौघांना अटक‎




सिन्नर-शिर्डी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन अडवून प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा कोपरगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल, सोन्याची लेडीज चेन आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महामार्गावरील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे चार वाजता अजित बुवाजी तोरसकर (वय २८, रा. विरार) हे पत्नीसमवेत मोटारसायकलवरून शिर्डी येथे दर्शनासाठी जात होते. सिन्नर-शिर्डी महामार्गावर तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलचा पाठलाग करून वाहन अडवले. त्यानंतर बंदुकीसारख्या वस्तूचा आणि चाकूचा धाक दाखवून तोरसकर यांच्याकडील ओप्पो व आयफोन कंपनीचे मोबाईल तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने चोरून नेली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे महेश सिताराम चंदनशिव याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने चोरीतील मोबाईल काळू उर्फ संतोष शंकरराव दळवी (रा. हिंगणी, ता. कोपरगाव) याला दिल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दळवी याला हिंगणी येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दळवी याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजू संजय बर्डे (वय २५), किरण बाळू जाधव (वय २७) आणि अमोल राजू राजपूत (वय २२) यांनाही ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी फिर्यादीचे दोन्ही मोबाईल, सोन्याची लेडीज चेन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत केली. काळू उर्फ संतोष दळवी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *