![]()
तालुक्यातील उक्कडगाव येथे एका दलित कुटुंबातील व्यक्तीला फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यात संबंधित व्यक्तीच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य तीन आरोपी फरार असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक नेते उत्तम रोकडे आणि नंदूभाऊ ससाणे यांनी उक्कडगाव येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कुटुंबीयांना धीर दिला. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. उत्तम रोकडे म्हणाले, हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून मानवतेवर आणि संविधानावर झालेला हल्ला आहे. फावड्याने मारहाण करून पायाचे हाड मोडण्यापर्यंत मजल जाणे निंदनीय आहे. फरार असलेल्या तीनही आरोपींना तातडीने अटक करून संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी. नंदूभाऊ ससाणे यांनीही आरोपींच्या अटकेची मागणी केली. पीडित कुटुंबाला न्याय, नुकसानभरपाई आणि शासकीय संरक्षण मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने पीडित कुटुंबाला शासकीय मदत व संरक्षण द्यावे, तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
Source link
फावड्याच्या वाराने पायाचे हाड मोडले; तिघे जण फरार:उक्कडगावातील प्रकरण; कारवाईची मागणी