![]()
पुण्यातील एमपीएससी आंदोलन आणि दिल्लीतील देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दिपकेंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, आईला माध्यमांसमोर बोलताना अश्रू अनावर झाले. तर, “हे सरकार लोकशाही मानत नाही, आणीबाणीनंतर पहिल्यांदाच देशात अशी हुकूमशाही सुरू आहे,” असा संतापजनक आरोप करत दिपके यांच्या वडिलांनी केंद्र व राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. तो काय पाकिस्तानी आहे का? आईचा अश्रूंसह सरकारला संतप्त सवाल अभिजीत दिपके यांच्या आईने अत्यंत भावुक होत माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. “अभिजीत रस्त्यावर उतरून जे काही करत होता, ते स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हते; तो देशातील गरीब मुलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी लढत होता. तो काय तिथे जाऊन दंगा करणार होता का? आधी म्हणाले तो पाकिस्तानी आहे, आता म्हणतात आंदोलन करतो म्हणून अटक करतो. तो काही पाकिस्तानी नाही. सरकारने त्याला विनाकारण ताब्यात घेऊन घोर अन्याय केला आहे.” लाठ्या-काठ्या घेऊन फिरणाऱ्यांना अभय “इन्स्टाग्रामवर हातात उघडपणे लाठ्या-काठ्या घेऊन हिंसेच्या रील्स पोस्ट करणाऱ्यांवर हे सरकार कोणतीही कारवाई करत नाही. बलात्कार करणाऱ्यांना, चोरांना पोलीस सहजासहजी पकडत नाहीत; पण देशासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणांना मात्र लगेच उचलून तुरुंगात टाकतात. हे अत्यंत चुकीचे आणि लोकशाहीविरोधी आहे.” अटकेची आधीपासूनच होती भीती “मी त्याला घराबाहेर पडतानाच बजावले होते की, हे सरकार फार विचित्र आहे, ते तुला नक्की अटक करतील. तो म्हणाला, ‘मम्मी, घाबरू नको, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल.’ पण मला रोज भीती वाटायची की सरकार कधीही त्याला ताब्यात घेईल, आणि अखेर सरकारने आज तेच केले,” असे सांगताना त्यांना अश्रू रोखता आले नाहीत. हे लोकशाही मानत नाहीत, गुजरातच्या दंग्यातून तयार झालेले नेते! -वडिलांचा घणाघात अभिजीत दिपके यांच्या वडिलांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आणि चुकीच्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. हे लोकशाही दडपण्याचे उघड कारस्थान आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लोकशाही मान्यच नाही; ते गुजरातच्या दंग्यांमधून तावून-सुलाखून तयार झालेले नेते आहेत. त्यांना या देशातून लोकशाही संपवायची आहे.” परवानगीचा कांगावा कशासाठी? “सरकार म्हणते आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. ज्या सत्ताधाऱ्यांनी जनतेवर अन्याय केला आहे, त्यांच्याकडेच आंदोलनाची परवानगी मागितली तर ते परवानगी देतील का? जर कोणी चुकले असेल आणि आम्ही त्यांना प्रश्न विचारत असू, तर ते रस्त्यावर येण्याची परवानगी कशी देतील? हा केवळ जनतेचा आवाज दाबण्याचा आणि विरोधकांना संपवण्याचा पूर्वनियोजित कट आहे.” आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती “1975च्या आणीबाणीनंतर देशात पहिल्यांदाच इतकी भीषण आणि भयानक दडपशाही पाहायला मिळत आहे. लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेला हा कारभार देशाच्या संविधानाला काळीमा फासणारा आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा; संभाजीनगरात तणाव अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईपूर्वी संभाजीनगर पोलिसांनी त्यांच्या घराभोवती कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. दिल्लीत आणि पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनांना सोशल मीडियावरून तसेच प्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या महत्त्वाच्या चेहऱ्यांवर पोलिसांकडून देशभरात धरपकड सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, दिपकेंच्या अटकेनंतर त्यांच्या पालकांनी उपस्थित केलेले टोकदार प्रश्न आणि आईच्या डोळ्यांतील अश्रू यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सरकारविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. ————————————————————– हेही वाचा… LIVE अभिजीत दिपके विमानातूनच ताब्यात:ध्रुव राठीसह 600 समर्थक कोठडीत; 250 रेल्वे रद्द, 45 मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेटही नाही ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर विमानातूनच ताब्यात घेण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि ‘SIR’ प्रक्रिया थांबवण्याची मागणी करण्यासाठी जंतरमंतर येथे आयोजित पक्षाच्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी ते आले होते. युट्युबर ध्रुव राठी यांना गुरुग्राममधील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. याव्यतिरिक्त, राजधानीतील विविध भागांतून इतर ६०० समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
अभिजीत दिपकेंना ताब्यात घेताच आई भावुक:म्हणाल्या- हातात काठ्या घेऊन रील्स बनवणाऱ्यांना मोकळे रान अन् देशासाठी लढणाऱ्या माझ्या मुलाला बेड्या?