![]()
बनावट सिमकार्ड शोधणे आणि म्युल अकाउंट यांचा शोध घेऊन ती बंद करण्याची मोहीम महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून हाती घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त निलेश पालवे यांनी दिली. सायबर गुह्यांना आळा घालण्यासाठी ही मोहीम अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘शिखाज् कारीगरी’ आणि केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे भारताच्या विविध राज्यांमधील कला, हस्तकला, वस्त्रोद्योग, फॅशन आणि जीवनशैलीचा समृद्ध वारसा एकाच छताखाली आणणारा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ या उपक्रमाचे आयोजन ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान बंड गार्डन रोडवरील द पूना क्लब लिमिटेड इथे करण्यात आले आहे. त्यानिमित्त “सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त निलेश पालवे, सायबर तज्ज्ञ प्रतिक दुबे आणि ग्रोकाय संस्थेचे संस्थापक ऋषिकेश हुंबे उपस्थित होते. अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, त्याला आळा घालण्यासाठी सायबर पोलीस विविध मोहिमा राबवत आहेत. बनावट सिमकार्डचा वापर करून होणारे आर्थिक फसवणुकीला आळा बसावा म्हणून सायबर पोलिसांनी राज्यभर बनावट सिमकार्डे शोधणे आणि म्युल अकाउंटचा शोध घेऊन ती बंद करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली असल्याचे पालवे यावेळी म्हणाले. सध्या मोबाइलवरून होणारे सायबर फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामध्ये वॉट्सअप, सोशल मीडिया, फेसबुक यांचा समावेश आहे. लोकांना घाबरवून, दबाव आणणे असे प्रकार सायबर गुन्हे करणारी मंडळी करतात. त्यामुळे प्रत्येकाने सायबर साक्षर होणे आवश्यक आहे. संगणकावर, मोबाइलवर कशावरही क्लिक करण्यापूर्वी विचार करा. आपल्या संगणकाची सुरक्षा भक्कम करा, आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. सायबर फसवणुकीला बळी पडलात तर तातडीने १९३० या फोन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवा असे पालवे यावेळी म्हणाले.
Source link
बनावट सिमकार्ड, म्युल अकाउंट शोधण्याची मोहीम व्यापक:सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून मोहीम; उपायुक्त निलेश पालवे यांची माहिती