![]()
‘अप्पर वर्धा धरणातून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाणी उपलब्ध असतानाही वीजपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. त्यामुळे महावितरणने उपाययोजना करून ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर अपग्रेड करावे,’ अशी मागणी तिवसा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुधीर गिरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निरंतर वीज योजनेअंतर्गत तिवसा शहर व तालुक्यातील शेतकरी फिडरवरील अतिरिक्त भार असलेल्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून त्यांचे अपग्रेडेशन करावे, आवश्यक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून बसवावेत, अशी मागणी या वेळी केली. ज्या ठिकाणी लोडशेडिंग अथवा वारंवार ट्रिपिंगच्या समस्या आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सिंचनाची गरज लक्षात घेऊन सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशीही मागणी केली. रब्बी हंगाम, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता अप्पर वर्धा धरणातून सोडण्यात येणारे पाणी मर्यादित कालावधीचे आहे. त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा पूर्ण उपयोग करता यावा, यासाठी वीजपुरवठा सुरळीत राहणे आवश्यक आहे. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नगरसेवक वैभव वानखडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक रवींद्र हांडे, युवक काँग्रेसचे सचिव रितेश पांडव, नगरसेवक किसन मुंदाणे व अमर वानखडे, इतर पदाधिकारी प्रफुल्ल देशमुख, जितेंद्र ठाकूर, विश्वजित बाखडे, नितीन अर्डक, प्रणव गौरखेडे, सुनील उतखेडे, उमेश राऊत, गजानन भोंबे, गौरव चौधरी, आकाश मकेश्वर आदी उपस्थित होते.
Source link
ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर अपग्रेड करण्याची मागणी:काँग्रेसचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर