![]()
शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क परिसरात फिरायला आलेल्या नागरिकांनाही पोलिसांकडून अडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या कारवाईचा निषेध करत अमित ठाकरे यांनी थेट शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच, ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांना तातडीने सोडण्याची मागणी केली. ‘शिवाजी पार्कला वॉर झोन केलंय का? लोकशाही आपल्या डोळ्यांसमोर संपताना दिसत आहे; पण ती आम्ही संपून देणार नाही,’ अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर टीका केली. ‘आजचा पोलिसांचा शेवटचा दिवस. उद्यापासून मी 10 हजारांचा मॉब घेऊन येईन. आमच्या आंदोलनाला हात लावून दाखवा,’ असा इशाराही त्यांनी दिला. शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त; नागरिकांनाही अडवल्याचा आरोप शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. परिसरात येणाऱ्या विविध रस्त्यांवर पोलिसांकडून तपासणी आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असल्याचे घटनास्थळावरील दृश्यांमधून दिसून आले. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. अमित ठाकरे यांनी सांगितले की, ते संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरायला निघाले होते. त्यावेळी शिवाजी पार्क परिसरातील बरिस्टा हॉटेलसमोर पोलिसांनी त्यांना अडवले. ‘ए चुच, कुठे चाललाय?’ अशा शब्दांत पोलिसांनी आपल्याला विचारल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ही तरुणांशी बोलण्याची पद्धत आहे का? एखाद्या व्यक्तीला ओळखत असलात तरी त्याच्याशी अशा पद्धतीने बोलायचे का? शिवाजी पार्कला फिरायला येणाऱ्या नागरिकांशी पोलिसांनी कसे वागावे, याचे काही नियम आहेत की नाहीत?’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. शिवाजी पार्क परिसरात फिरायला आलेल्या तीन-चार जणांनाही पोलिसांनी विनाकारण ताब्यात घेतल्याचा आरोप अमित ठाकरे यांनी केला. या परिसरात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही अडवले जात असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘लोकशाही संपताना दिसतेय, पण ती संपून देणार नाही’ शिवाजी पार्कमधील परिस्थितीवर संताप व्यक्त करताना अमित ठाकरे यांनी राज्यातील लोकशाहीच्या स्थितीवरही भाष्य केले. ‘या सरकारने विचित्र परिस्थिती आणली आहे. लोकशाही आपली संपली आहे, हे आपल्या डोळ्यांसमोर संपताना दिसत आहे. पण ती आम्ही संपून देणार नाही,’ असे ते म्हणाले. आंदोलकांना शांततेत आंदोलन करू देण्याऐवजी त्यांना ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘तरुण येऊन शांततेत आंदोलन करणार म्हणून एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी लावला आहे? शिवाजी पार्कमध्ये वर्षानुवर्षे लोक फिरायला येतात. त्यांनाही ताब्यात घेतले जात असेल, तर ही कसली पद्धत आहे?’ असा सवाल त्यांनी केला. शिवाजी पार्क परिसराला युद्धभूमीचे स्वरूप आल्याची टीका करत त्यांनी या कारवाईचा निषेध केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची तातडीने सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ‘महाराष्ट्र पोलिसांचा आम्ही आदर करतो; पण ही पद्धत चुकीची’ अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल आदर व्यक्त करतानाच सध्याच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. ‘महाराष्ट्र पोलिसांचा आम्ही आदर करतो. महाराष्ट्र पोलिसांसारखे पोलीस नाहीत, असे आम्ही वर्षानुवर्षे सांगत आलो आहोत. पण तुम्ही हे करू शकत नाही,’ असे ते म्हणाले. दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप केला. दिल्लीमध्ये पोलिसांनी विमानाच्या आत जाऊन आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा, तसेच महिला आंदोलकांशी गैरवर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला. ‘दिल्लीमध्ये जे घडले ते पाहून महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही, याचे समाधान वाटले होते. मात्र, आता महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आणली जात आहे,’ अशी टीका त्यांनी केली. दिल्लीतील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांवर कथितरीत्या हात उचलण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. ‘मला डिटेन करून दाखवा’; पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी आपल्याला अडवल्याबद्दलही अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मी इकडेच राहतो. मग मला शिवाजी पार्कमध्ये चालायला येता कामा नये का?’ असा सवाल त्यांनी केला. ‘मी आता इकडे दररोज येणार आहे. मला डिटेन करूनच दाखवा,’ असे आव्हान त्यांनी पोलिसांना दिले. तसेच, आपल्याला अडवण्याऐवजी आंदोलकांवरील कारवाई थांबवावी, असेही ते म्हणाले. परिसरातील परिस्थिती पाहता आपण शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन भूमिका मांडणार असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘कुठे नेणार, नेऊन नेऊन? मी पोलीस ठाण्यात जाऊन बसतो. त्यांना काय करायचे ते करू द्या. आता हे नाटक बंद झाले पाहिजे,’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांना सोडले पाहिजे आणि परिसरातील पोलीस बंदोबस्त तातडीने हटवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ‘उद्यापासून आमचे सैनिक असतील’; 10 हजारांचा मॉब आणण्याचा इशारा शिवाजी पार्कमधील कारवाईवरून अमित ठाकरे यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. ‘हा आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून आमचे सैनिक असतील, मग बघू काय होते,’ असे ते म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, ‘आजचा पोलिसांचा शेवटचा दिवस. उद्यापासून मी 10 हजारांचा मॉब घेऊन येईन. मी इकडून राऊंड मारणार.’ उद्यापासून आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींना अडवून दाखवण्याचे आव्हानही दिले. ‘उद्यापासून आमचे आंदोलन आहेच. त्याला हात लावून दाखवावा, ते थांबवून दाखवावे आणि आंदोलनासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींना ताब्यात घेऊन दाखवावे,’ असे आव्हान त्यांनी दिले. आंदोलकांचा पोलिसांच्या कारवाईला विरोध शिवाजी पार्क परिसरात पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेतले जात असताना काही आंदोलकांनीही या कारवाईवर आक्षेप घेतला. एका आंदोलकाने इंग्रजी आणि मराठीमध्ये प्रतिक्रिया देताना, आपण भारतीय नागरिक असून आपल्याला आंदोलन करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप केला. ‘हा माझा देश आहे. मी बोलणार. मला निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हवा आहे,’ अशी मागणी या आंदोलकाने केली. पोलिसांकडून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्याने कारवाईचा निषेध केला. दरम्यान, मनसेच्या एका कार्यकर्त्याने दावा केला की, दुपारी 12 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास चैत्यभूमी परिसरात पोलिसांनी काही स्थानिक नागरिकांना बोलावून आंदोलनासाठी येणाऱ्या लोकांना विरोध करण्यास सांगितले. मात्र, हा दावा संबंधित यंत्रणेकडून स्वतंत्रपणे पडताळण्यात आलेला नाही. शिवाजी पार्क परिसरातील परिस्थितीवर राजकीय वातावरण तापले शिवाजी पार्क परिसरातील पोलीस बंदोबस्त आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अमित ठाकरे यांनी या कारवाईला लोकशाहीविरोधी ठरवत ती तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, परिसरातील घडामोडींमुळे आंदोलक आणि पोलिसांमधील तणाव वाढल्याचे घटनास्थळावरील दृश्यांवरून दिसून येत आहे. अमित ठाकरे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडण्याचे स्पष्ट केले. तसेच, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याची मागणी करत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. हेही वाचा… कॉक्रोच जनता पार्टीचे मुंबईत आंदोलन:शिवाजी पार्कला छावणीचे स्वरूप, आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीनंतर आता मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीत आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांनी हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आता पक्षाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सविस्तर वाचा..
Source link
शिवाजी पार्कला वॉर झोन केलंय का?:अमित ठाकरे पोलिसांवर संतापले; म्हणाले, ‘उद्यापासून 10 हजारांचा मॉब घेऊन येईन’