Headlines

अकोटमध्ये 73 नवदुर्गा, 19 शारदा मंडळांची स्थापना:रंगरंगोटी अन् आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला‎




अकोट शहरात रविवारी नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त शहरात ७३ नवदुर्गा मंडळे, तर १९ शारदा मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान शहरातील विविध देवी मंदिरांसह सार्वजनिक नवरात्र मंडळांच्यावतीने घटस्थापना करण्यात आली. दररोज भजन, कीर्तन, यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तरीही नवरात्र महोत्सवाचा उत्साह शहरासह ग्रामीण भागात कायम आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध देवी मंदिरांसह सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. देवी मंदिरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि आकर्षक सजावट पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कबुतरी मैदान येथील श्री देवी माता मंदिर, गवळीपुरा येथील रेणूका माता मंदिर, बारगण येथील दुर्गा माता मंदिर, यात्रा चौकातील कालंका माता मंदिर, केशवराव वेताळ येथील रेणूका माता मंदिर यांसह अन्य मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता, मंदिर संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहर पोलिसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलाचे ४० जवान, केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक प्लाटून, दंगल नियंत्रण पथकाची एक प्लाटून तसेच अकोला पोलिस मुख्यालयातील अतिरिक्त पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांची होणारी गर्दी, धार्मिक कार्यक्रम आणि सार्वजनिक मंडळांचे आयोजन लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर पोलिस प्रशासनाचा भर राहणार आहे. नवरात्र मंडळांकडून देखाव्यांची तयारी सार्वजनिक नवरात्र मंडळांनीही यंदाच्या महोत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. विविध मंडळांच्यावतीने आकर्षक देखावे साकारण्यात आले असून, नऊ दिवस भजन, कीर्तन आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पुढाकारातून रास-गरब्याचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक उत्साही राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *