Headlines

वाळलेल्या पिकांचे पेंढे घेऊन तहसील कार्यालयात ठिय्या:दिंडोरीत शेतकऱ्यांचे आंदोलन; तालुका दुष्काळी घोषित करण्याची मागणी‎




तालुक्यात झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, दिंडोरी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक मणियार आणि माजी सरपंच संतोष रहिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी हातात व डोक्यावर वाळलेल्या भात, वरई आणि सोयाबीन पिकांचे पेंढे घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. तालुक्यातील ८० टक्के भागात पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, भात, नागली, वरई, उडीद, मका, सोयाबीन आणि टोमॅटो ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप याप्रसंगी जमलेल्या शेतकरी आंदोलकांनी केला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत हाताशी आलेले पीक गेल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तौफिक मणियार आणि संतोष रहिरे यांनी यावेळी तहसील प्रशासनाला इशारा देत, कोणत्याही जाचक अटी व शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी आणि दिंडोरी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा न झाल्यास आठ दिवसांत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही याप्रसंगी त्यांनी दिला आहे. दिंडोरी तहसील कार्यालय आवारात केलेल्या या आंदोलनात शाम गवारे, गुलाब गायकवाड, योगेश कराड, संदीप भेरे, दसरथ शेखरे, हिरामण शिंदे, सोनीबाई गायकवाड, विठ्ठल माळेकर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *