![]()
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले महामार्ग रोको आंदोलन आज सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीपासून हावेरीपर्यंत हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले असून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या आंदोलनावर बोलताना स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “काळा पैसा कमावणाऱ्या दलालांना आणि खासगी कंपन्यांना पोसण्यासाठीच केंद्र सरकारचा हा अट्टाहास सुरू आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. ‘नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही’ आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी म्हणाले, “काल सकाळी ११ वाजल्यापासून महामार्ग रोखून धरलेला आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण केंद्र सरकारसोबत ४ तास डोकेफोड करूनही काहीही साध्य झाले नाही. २४ तास उलटूनही निर्णय झालेला नाही. ‘नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही’ या न्यायाने दुर्दैवाने आम्हाला हा रस्ता रोखण्याचा निर्णय घ्यावा लागला.” ड्रायव्हर्सची उपासमार होऊ देऊ नका! रस्त्यावर अडकलेल्या वाहनचालकांबाबत संवेदनशीलता दाखवत शेट्टी यांनी स्थानिक शेतकऱ्यांना मोठे आवाहन केले. “महामार्गावर बाहेरच्या राज्यातून आलेले अनेक ट्रक आणि कंटेनर ड्रायव्हर अडकले आहेत. त्यांची उपासमार होता कामा नये. त्यांच्या चहा-जेवणाची व्यवस्था करा. व्यवस्था होत नसेल तर संघटनेशी संपर्क साधा, आम्ही शिधा पुरवू. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकचे आतिथ्य आपण दाखवून दिले पाहिजे,” असे ते म्हणाले. सरकारने एक रुपयाही खर्च करायचा नाही, तरीही चालढकल शेट्टींनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार प्रहार केला. “सरकारच्या तिजोरीवर एक रुपयाचाही बोजा पडणार नाही, एवढीच आमची मागणी आहे. ६० रुपयांनी विकल्या जाणाऱ्या साखरेची ५० रुपयांची हमी आम्हाला हवी आहे. तसेच, इथेनॉलमधून मिळणारा पैसा कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांना द्यावा. गेल्या वर्षभरात ऑईल कंपन्यांनी १ लाख ५० हजार कोटी रुपयांचा नफा कमावला, ज्यातील बहुतांश वाटा इथेनॉलचा आहे. आपल्या जीवावर बाकीचे चैन करत आहेत आणि आपण रस्त्यावर आहोत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशचे उदाहरण देत त्यांनी साखरेच्या दरातून कसा काळा पैसा निर्माण होत आहे, हेही स्पष्ट केले. “शेतकऱ्यांनो, ऊस शेतातच ठेवा!” शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करताना शेट्टी म्हणाले, “जोपर्यंत आपल्या शेतात ऊस आहे, तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस फक्त ८-१० दिवस शेतातच ठेवावा. नवीन साखर तयार झाली नाही तर बाजारात साखर येणार नाही आणि बरोबर केंद्र सरकारची कोंडी होईल. हे एक ऐतिहासिक आंदोलन असून, कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्यांना अद्दल घडवण्याची हीच योग्य वेळ आहे.” आता हे आंदोलन किती दिवस चालणार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून आहे. ————————– हेही वाचा.. नालासोपाऱ्यातील इमारतीला भीषण आग:2 महिलांचा गुदमरुन मृत्यू, 20 ते 25 जणांची सुखरूप सुटका
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे मंगळवारी रात्री एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, अग्निशमन दल आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत इमारतीत अडकलेल्या २० ते २५ जणांची सुखरूप सुटका केली आहे. सविस्तर वाचा
Source link
कोल्हापुरात महामार्ग रोको आंदोलनाचा दुसरा दिवस:8-10 दिवस शेतातला ऊस शेतातच राहू द्या, मगच सरकारला अक्कल येईल; राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन