![]()
पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने स्वतःला पोलिस असल्याचे भासवून ही फसवणूक केली असून, याप्रकरणी खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लता अरुण साळुंके (वय ६०, रा. चाकण) यांनी याबाबत खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, केतन दादासाहेब साळुंके (वय ४०, रा. लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी केतनने लता साळुंके यांच्या नातीला महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. आरोपीने आपण पोलिस असून, महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे सांगितले होते. खराडी भागातील एका उपाहारगृहाजवळ त्याने लता साळुंके यांची भेट घेऊन गेल्या १५ ते २० दिवसांत वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेतले. पैसे मिळाल्यानंतर त्याने नोकरी लावण्याबाबत टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंके यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एन. घुले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नर्सरी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा दरम्यान, रोपवाटिका (नर्सरी) व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यक्तीची ४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा दुसरा प्रकार लोणी काळभोर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महेंद्र बाबू जैनजांगडे (वय ३९, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, किशोर लक्ष्मण साठे (वय ३५) आणि अर्चना किशोर साठे (वय ३४, दोघे रा. सोरतापवाडी) या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दाम्पत्याने महेंद्र जैनजांगडे यांची ओळख करून रोपवाटिका व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवले होते. जैनजांगडे यांनी आरोपींना वेळोवेळी रोख स्वरूपात आणि धनादेशाद्वारे रक्कम दिली. मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपींनी त्यांना कोणताही परतावा दिला नाही. जैनजांगडे यांनी पैशांची मागणी केली असता, दाम्पत्याने टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक:पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल