![]()
महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती असून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून पंचनामे सुरू केले आहेत. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्षेप घेत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे. रविकांत तुपकर म्हणाले, दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची मदत देऊ, असं राज्य सरकारने सांगितलं, ही निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पाच हजार रुपये देता म्हणजे तुम्ही आम्हाला काय भिकारी समजता का? आम्ही काय भिकारी आहोत का? अरे आम्ही देशाचे अन्नदाते आहोत, आम्ही पोशिंदे आहोत. आम्ही नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा? आमच्या भरोशावर तुम्ही आहात लक्षात ठेवा आणि पाच हजार रुपयात काय होणार आहे हो? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला. असलं हे थोतांड बंद करा आम्हाला हेक्टरला खर्च एक लाख रुपये आलेला आहे. त्यामुळे हेक्टरची मर्यादा न ठेवता प्रति हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई आम्हाला शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. सरकारला आमचं आव्हान आहे की पाच हजार रुपयांची मदत आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आमच्याकडे येऊन राहा वर्षभरासाठी आणि त्याच्यात तुम्ही दिवाळी करा, असलं हे थोतांड बंद करा, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. हेक्टरला एक लाख रुपये नुकसान भरपाई द्या शेतकऱ्याला जर तुम्ही गृहीत धरण्याचा प्रयत्न करत असाल तर गाव गाड्यातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. ५ हजार रुपयाची मदत मान्य नाही. हेक्टरला एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचं उभं राहणार आहे, असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. राज्य सरकारचा बळीराजाला दिलासा:दुष्काळग्रस्तांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; चारा हमीभावाने खरेदीसह मुख्यमंत्री फडणवीसांचे 4 मोठे निर्णय राज्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने बळीराजाला मोठा दिलासा देणारे चार महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या 265 तालुक्यांमध्ये आणखी 40 तालुक्यांची भर घालत आता राज्यातील तब्बल 305 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
Source link
'शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देता, आम्हाला भिकारी समजता का?':राज्य सरकारच्या मदतीवर रविकांत तुपकर यांचा संताप