Headlines

बीड जिल्हा कारागृहातील नवी ऑडिओ क्लिप व्हायरल:जेलमध्ये कराडचा दबदबा? मारहाण, दबाव आणि व्हीआयपी ट्रीटमेंट?




बीड जिल्हा कारागृहातील घडामोडींनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरुंगातील कैद्यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगकडून इतर कैद्यांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोप यामध्ये करण्यात आले आहेत. आधी अझहर पठाण या कैद्याच्या दोन वेगवेगळ्या क्लिप्स समोर आल्या होत्या, आणि आता सनी आठवले या कैद्याची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. याआधी व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अझहर पठाणने सुरुवातीला आपल्याला कराडच्या गँगकडून मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मात्र, दुसऱ्या क्लिपमध्ये त्यानेच आपल्यावर दबाव टाकून जबाब बदलायला लावल्याचे सांगितले. या विरोधाभासी विधानांमुळे आधीच संशयाचे वातावरण तयार झाले होते. त्यात आता सनी आठवलेच्या ऑडिओने आणखी नवीन दावे समोर आणले आहेत. सनी आठवलेच्या कथित संभाषणात त्याने म्हटले आहे की, अझहर पठाणवर खरोखरच मारहाण झाली होती आणि त्याचा जबाब बदलण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच वाल्मिक कराडला बंदी असतानाही रात्री उशिरा बाहेर काढून त्याचा जबाब घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रात्री साडेआठच्या सुमारास त्याला बाहेर काढून चौकशी करून पुन्हा बॅरेकमध्ये आणल्याचे तो सांगतो. या ऑडिओमध्ये आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडकडून काही कैद्यांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचे, कॅन्टीनमध्ये सवलती दिल्या जात असल्याचे, तसेच त्याच्या गँगकडून खोटे गुन्हे दाखल करून इतर कैद्यांना त्रास दिला जात असल्याचेही म्हटले आहे. सनी आठवलेने असा दावा केला की, कराडकडे अनेक सिमकार्ड आहेत आणि त्याला तुरुंगात कोण मदत करतं, कोण पैसे देतं याची माहितीही त्याला आहे. तुरुंगात व्हीआयपी सुविधा यासोबतच सर्वाधिक चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे कराडला तुरुंगात व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा आरोप. त्याला नवीन डिश टीव्ही देण्यात आली असून इतर कैद्यांपेक्षा वेगळ्या सुविधा दिल्या जात असल्याचे या ऑडिओमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच संपूर्ण तुरुंग प्रशासन त्याच्या प्रभावाखाली असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तुरुंगात येऊन झडती घ्यावी दरम्यान, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही या ऑडिओमधून करण्यात आली आहे. बाहेरच्या स्वतंत्र पथकाने तुरुंगात येऊन झडती घ्यावी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही लक्ष घालावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या सर्व ऑडिओ क्लिप्सची अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने सत्य काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तरीही या प्रकरणामुळे बीड कारागृहातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *