Headlines

नाशिक, संभाजीनगरच्या वाहन भाडे करारात मोठी तफावत:विजय कुंभारांच्या पोस्टने प्रशासनावर गंभीर आरोप; करारातच भ्रष्टाचार?




राज्यातील शासकीय विभागांमध्ये वाहन भाड्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच प्रकारच्या वाहनासाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आठ तासांच्या करारावर घेतल्या जाणाऱ्या गाडीचे भाडे सुमारे 1620 रुपये आहे. मात्र, त्याच प्रकारच्या गाडीचे भाडे छत्रपती संभाजीनगरमध्ये 3000 रुपये आकारले जाते. एवढ्यावरच न थांबता 12 तासांच्या करारासाठी नाशिकमध्ये 2520 रुपये तर संभाजीनगरमध्ये 5300 रुपये मोजावे लागतात. या दरांतील फरक नेमका कशामुळे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय, फॉर्च्युनर सारख्या महागड्या वाहनांसाठीही दरांमध्ये मोठा फरक असल्याचे कुंभार यांनी नमूद केले आहे. आठ ते अकरा तासांच्या कालावधीसाठी या वाहनांचे दर अनुक्रमे 3000 ते 3500 रुपये आणि दुसऱ्या ठिकाणी 7000 ते 11000 रुपये इतके आहेत. बाजारभावाच्या तुलनेत हे दर अधिक असल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे. कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, दर करार हा शासन व्यवस्थेतील एक छोटा भाग असला, तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता असते. शालेय साहित्य, गणवेश, संगणक साहित्य, टोनर, वाहनांचे सुटे भाग किंवा वाहने भाड्याने घेणे अशा विविध बाबींसाठी दर करार केले जातात. काही वेळा हे करार न करता देखील खरेदी किंवा सेवा घेतल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उदाहरण देत कुंभार यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, काही अधिकारी दरमहा सुमारे 50 हजार रुपये इंधन भत्ता घेतात. तसेच गेल्या पाच वर्षांत गाड्या भाड्याने घेण्याच्या खर्चात 1.50 कोटींपासून 30 कोटींपर्यंत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. ही वाढ अनियमिततेकडे निर्देश करते, असा त्यांचा दावा आहे. या सर्व प्रकारांमुळे शासकीय तिजोरीवर मोठा ताण पडत असून, हा केवळ प्रशासकीय त्रुटीचा मुद्दा नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा भाग असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. अशा प्रकारचे घोटाळे वर्षानुवर्षे सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे. कुंभार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *