Headlines

आधी वडील, आता मुलगा!:आमदार संजय गायकवाडांच्या पुत्राचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ




बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, आता त्यांच्या मुलाने शिवीगाळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून दिव्य मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाडचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांच्या घराखाली जाऊन कुणाल गायकवाडने गाडीवर उभे राहून अश्लील शिवीगाळ केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. आधी वडिलांची शिवीगाळ व्हायरल झाली आणि आता त्यांच्या मुलाची शिवीगाळ, यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीतच मिळाले आहे. काय आहे नेमके प्रकरण? बुलढाणा नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर प्रभाग क्रमांक 6 मधून 1437 मते मिळवणारे उमेदवार कुणाल गायकवाड आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक काँग्रेस नेते दत्ता काकस यांच्यातील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवडणुकीत दत्ता काकस यांच्या पत्नी देखील नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात होत्या, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कुणाल गायकवाड यांनी काढलेल्या मिरवणुकीदरम्यान काकस यांच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष केला. इतकेच नाही तर गायकवाड यांनी चक्क गाडीच्या बोनेटवर चढून दत्ता काकस यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असून, राजकीय वर्तुळात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या काळात कुणाल गायकवाडवर गुन्हा दाखल सध्या सोशल मीडियावर कुणाल गायकवाड यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतानाच, निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर आणि त्यांचे नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचीही चर्चा रंगली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या एका बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर असून, याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कलम 132, 49 आणि 351 (2-3-5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *