Headlines

कोर्टाची देवी::संभाजीनगरातली 350 वर्षांपूर्वीची पहिली स्वयंभू रेणुका माता; तांबुलाचा प्रसाद, काचेची कलाकुसर अन् दाट हिरवाई!




कालांतराने शहरं बदलतात, अनेक गोष्टी काळाच्या ओघात मागे पडतात. मात्र, काही ठिकाणांचा इतिहास आणि त्यांच्याशी जोडलेली श्रद्धा आजही तितकीच कायम आहे. केशरसिंगपुरा येथील रेणुका माता मंदिर हे त्याचंच एक उदाहरण. या मंदिराला एक- दोन नव्हे तर तब्बल 350 वर्षांचा इतिहास आहे. हे मंदिर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागे वसलेले असल्यामुळे या ठिकाणाला कोर्टाची देवी म्हणूनही ओळखले जाते. मंदिराचा परिसर दाट हिरवाईने वेढलेला असल्याने येथील वातावरण प्रसन्न आणि शांततादायी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही या परिसरात मनाला वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. देवीचा स्वयंभू तांदळा छत्रपती संभाजीनगरात रेणुका मातेची अनेक मंदिर आहेत. त्यातील बऱ्याच मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, कोर्टाच्या देवीची कहाणीच निराळीच आहे. ही रेणुका माता स्वयंभू असल्याचे मानले जाते. केशरसिंगपुऱ्यात देवीचा तांदळा आढळला. या तांदळ्याची 70 च्या दशकात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री क्षेत्र सोनई येथील अण्णा महाराजांच्या वेदोच्चारात हा सोहळा पार पडल्याची माहिती मंदिराच्या माहितीपत्रकात नमूद आहे. त्यानंतर 2003 मध्ये दुसऱ्यांदा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. दर मंगळवारी होणाऱ्या अभिषेक पूजेनंतर देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक येतात. कळस नसणारे मंदिर रेणुका मातेचे हे मंदिर पुरतान राजस्थानी पद्धतीने बांधले आहे. सुरुवातीला या मंदिराला कळस व कमान नव्हती. कारण मुघल साम्राज्यात मंदिरे पाडली जायची. त्यामुळे या मंदिराला कळसाऐवजी घुमटासारखा आकार देण्यात आला होता. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला व कळस लावण्यात आला. मंदिरातील देवीची ही मूर्ती मुळात लक्ष्मी देवी व कालिका देवी अशी होती. श्री क्षेत्र सोनई शक्ती पिठाचे हरिहरानंद अण्णा महाराज यांनी या मूर्तीला रेणुका देवीचा आकार दिलेला आहे. शहरातील पहिले रेणुका मातेचे हे मंदिर असून या मंदिरात तांबुळाचा प्रसाद वाटप करण्यात येतो, अशी माहिती मंदिराचे पुजारी डोलारे गुरूजी यांनी दिली. नवसाला पावणारी देवी म्हणूनही हे स्थान प्रचलित आहे. पिंडीच्या सभोवताली काचेची कलाकुसर देवीसमोरच काळभैरवाचं मंदिर आहे. परिसरातील महादेवाच्या पिंडीचं स्थानही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पिंडीच्या सभोवतालचा संपूर्ण भाग काचेच्या सुंदर कलाकृतींनी सजवण्यात आला आहे. या कलाकुसरीमुळे महादेवाचं स्थान अधिक आकर्षक दिसतं. तसेच बाजूला विठ्ठल रखुमाईच्या मंदिर आणि गणपती मंदिर देखील आहे. त्यामुळे येथील वातावरण भक्तिमय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नवरात्रात भक्तिगीतांचे कार्यक्रम नवरात्रोत्सवात मंदिरात नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पारंपरिक भजनसेवेसोबत शहरातील नामांकित गायकांचे भक्तिगीतांचे कार्यक्रम होतात. महाअष्टमीला होम, विजयादशमीला देवीदर्शन आणि कोजागरी पौर्णिमेला प्रज्वलित केली जाणारी दीपमाळ हे उत्सवातील प्रमुख भाग आहेत. या काळात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. जुन्या वृक्षांमुळे परिसराला वेगळेपण मंदिर परिसरात जुनी वडाची आणि चिंचेची झाडं असून, निजामकालीन बारवही आहे. शहरातील वर्दळीच्या भागात असूनही झाडांनी वेढलेल्या या परिसरात शांतता अनुभवायला मिळते. परिसरातील नैसर्गिक वातावरण टिकवून ठेवण्यावर संस्थानाचा भर असल्याचं माहितीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग यांचा संगम असलेलं हे मंदिर शहरातील भाविकांसाठी महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *