Headlines

न्यायासाठी पुन्हा तुरुंगात जायलाही तयार!:संजय राऊतांचा हल्लाबोल, बांगलादेश-श्रीलंकेचे दाखले देत 'रेझिम चेंज'च्या आंदोलनाचे जोरदार समर्थन




“देशाचे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्चच आहे आणि संविधानावर आमची गाढ श्रद्धा आहे. ज्येष्ठ वकिलांच्या सल्ल्यानुसार न्यायालयाचा अवमान झाला अशी भावना असेल तर मी दिलगिरी व्यक्त करून माफीही मागितली आहे. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा. साडेचार वर्षांपासून शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह घटनाबाह्य पद्धतीने तिसऱ्याच पक्षाला बहाल करून आम्हाला मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले गेले आहे. चाळीस आमदारांच्या अपात्रतेचा फैसला अद्याप प्रलंबित आहे. मतदारयादीतून कोट्यवधी मतदारांची नावे वगळून लोकशाहीची उघड हत्या केली जात आहे. या अन्यायाविरोधात लढताना मला जर पुन्हा तुरुंगात जावे लागले, तरी माझी कोणतीही तक्रार नाही; मी तुरुंगात जाण्यास तयार आहे,” असा आक्रमक पवित्रा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतला. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांचे विधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि ‘रेझिम चेंज’च्या (राजवट बदल) मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. मी माफी मागितली, आता सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय द्यावा! न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने केलेल्या तक्रारीवर आणि मिळालेल्या नोटीसवर खुलासा करताना संजय राऊत म्हणाले, “मी जे वक्तव्य केले, ते विधान सर्वप्रथम ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रशांत भूषण यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) केले होते. 6 जूनपासून अनेक माध्यमांमध्ये त्यावर चर्चा आणि शो झाले. सर्वोच्च न्यायालयाचे 65 न्यायाधीश मंत्र्यांसोबत लंडन दौऱ्यावर गेले होते, त्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मी फक्त त्याची आठवण करून दिली होती. इतरांवर कोणतीही कारवाई नाही, मग केवळ याचिकाकर्ता असलेल्या आम्हा राजकीय नेत्यांनाच लक्ष्य का केले जाते?” संविधानावर निष्ठा “माझ्या ज्येष्ठ वकिलांनी सांगितले की, न्यायालयाचा अवमान झाल्याची भावना निर्माण झाली असेल तर आपण आदर ठेवून माफी मागितली पाहिजे. त्यानुसार मी तत्काळ माफी मागितली आहे. कारण सर्वोच्च न्यायालय ही देशातील न्यायव्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे. तरीही नोटीस दिली असेल, तर आम्ही कायदेशीर लढाई लढू. मात्र, आमच्या लढ्याकडेही न्यायालयाने गांभीर्याने पाहिले पाहिजे.” पक्ष, चिन्ह आणि 40 आमदारांचा फैसला कधी? “गेल्या साडेचार वर्षांपासून आमचा मूळ पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिरावून एका अशा गटाला दिले गेले, ज्यांचा त्याच्याशी काहीही कायदेशीर संबंध नव्हता. त्या आधारावर त्यांनी निवडणुका लढवल्या आणि सत्तेचा उपभोग घेत आहेत. 40 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अजूनही रखडला आहे. संविधानाची ही उघड पायमल्ली थांबवून न्यायालयाने आम्हाला तातडीने न्याय दिला पाहिजे.” एसआयआरच्या माध्यमातून 13 कोटी मतदारांवर दरोडा! मतदारयादीतील घोळावर बोट ठेवताना राऊत यांनी आकडेवारी मांडली. “एसआयआरच्या (SIR) नावाखाली देशातील तब्बल 13 कोटी मतदारांची नावे मतदारयादीतून बेकायदेशीरपणे वगळण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांचा समावेश असून एकट्या मुंबईतील 65 लाख मतदारांची नावे उडवली गेली आहेत. हा थेट सामान्य जनतेच्या मताधिकारावर दरोडा आहे. या पीडित 13 कोटी मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लढत आहे. या लोकशाहीच्या लढाईसाठी मला जर तुरुंगात डांबले जात असेल, तरी मी आनंदाने तुरुंगात जाईन.” मुख्यमंत्री फडणवीसांना राजकीय ज्ञानाचा दुष्काळ; प्रत्येक आंदोलन ‘रेझिम चेंज’साठीच असते! प्रशांत भूषण यांच्या आंदोलनावरील विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत अत्यंत आक्रमक झाले. “प्रशांत भूषण यांनी ‘आम्हाला राजवट बदलायची आहे’ (रेझिम चेंज करायची आहे) असे म्हटले, तर मुख्यमंत्र्यांच्या पोटात का दुखते? मुख्यमंत्र्यांचे सर्व अवयव आणि इंद्रिये ठिकाणावर आहेत ना? लोकशाहीत विरोधी पक्ष रस्त्यावर उतरतो तो काय सत्ताधाऱ्यांची आरती ओवाळण्यासाठी? लोकशाहीतील प्रत्येक प्रखर जनआंदोलन हे राजवट बदलण्यासाठीच असते.” इतिहासाचे धडे दिले “आणीबाणीच्या काळात जनसंघाने जनता पक्षाची स्थापना कशासाठी केली होती? व्ही. पी. सिंग यांच्या मागे पाठिंबा देऊन राजीव गांधींचे सरकार का पाडले? मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भाजपने केलेली उग्र आंदोलने कशासाठी होती? ती सर्व आंदोलने ‘रेझिम चेंज’साठीच होती ना? महाराष्ट्रात दुष्काळ आहेच, पण भाजपच्या मानसिकतेला राजकीय ज्ञानाचा प्रचंड दुष्काळ पडला आहे. फडणवीसांना वेळ असेल तर त्यांनी माझ्या शेजारी बसावे, मी त्यांना राजकीय इतिहासाचे धडे देईन.” बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेत निवडणुका चोरल्या म्हणूनच जनतेचे बंड उसळले! भारतात शेजारील देशांसारखी अराजकता माजवण्याचा विरोधकांचा डाव असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आरोपांचा समाचार घेताना ते म्हणाले, “बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये सरकारविरोधात जी आंदोलने झाली, त्यांचा केंद्रबिंदू तिथला भ्रष्ट निवडणूक आयोग आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार हाच होता. बांगलादेशच्या निवडणूक आयुक्ताने तिथल्या सत्ताधाऱ्यांना जिंकवण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब केला, म्हणून जनतेने बंड करून त्याला हिरव्या लुंगीवर रस्त्यावर खेचले. देवेंद्र फडणवीसांनी ते व्हिडिओ पाहावेत. भारतात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून तेच काम सुरू आहे.” हे अराजक नाही, जनतेचे बंड “यंत्रणांचा गैरवापर करून, ईव्हीएम आणि मतदारयाद्या मॅनेज करून जर निवडणुका जिंकल्या जात असतील, तर ती राजवट बदलण्यासाठी जनता रस्त्यावर उतरते. याला अराजक म्हणत नाहीत, तर याला जनतेचे न्याय्य बंड म्हणतात,” असा इशारा संजय राऊत यांनी शेवटी दिला. ————————————————————- हेही वाचा… प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण:ठाण्यात राम पूर्णेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांनी दिले न्यायाचे आश्वासन, 2 दिवसांत पुन्हा बोलावले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील नेते प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी एक मोठी घडामोड समोर आली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत त्यांना न्यायाचे आश्वासन दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *