Headlines

पुण्यात 500 हून अधिक गणेश मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन:अडीच कोटी खर्चूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल गुलदस्त्यात; पुणेकर मंचाचा आरोप




गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील ५०० हून अधिक गणेश मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता असतानाही अद्याप पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे, ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाचा सविस्तर अहवाल जाहीर केलेला नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई आणि अहवाल प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याचा आरोप लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केला आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिस तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरातील विविध ठिकाणी ध्वनी पातळीची नोंद घेण्यात आली होती. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांनुसार व्यावसायिक क्षेत्रासाठी दिवसा ६५ डेसिबलची मर्यादा आहे. यंदा ध्वनी पातळीची नोंद घेण्यासाठी मंडळाने सुमारे २०० गणेश मंडळांच्या परिसरासह १५ चौकांमध्ये मोजमाप करण्याचे काम खासगी कंपनीला दिले होते. महाबळ एन्व्हायरमेंटल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे काम देण्यात आले होते. कंपनीने ज्या २०० ठिकाणी ध्वनी पातळीची नोंद घेतली, त्या सर्व ठिकाणी ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेचा भंग झाल्याची माहिती पुढे आली आहे. असे असतानाही संबंधित मंडळांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा दावा मंचाने केला आहे. पोलिसांनीही स्वतंत्रपणे ध्वनी पातळीच्या नोंदी घेतल्या होत्या; मात्र त्यासंदर्भातील माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही, असे मंचचे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे. ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’चा अहवाल प्रसिद्ध; एमपीसीबीचा मात्र प्रतीक्षेत गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाबाबत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) यांनी आपला अहवाल तातडीने प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, विविध ठिकाणी ध्वनीची सरासरी पातळी सुमारे १०४.५ डेसिबलच्या आसपास होती. दुसरीकडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सविस्तर अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार एका आठवड्याच्या आत अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अपेक्षित असताना त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप मंचाने केला आहे. यंदा कर्णकर्कश आवाजाविरोधात अनेक पुणेकर रस्त्यावर उतरले होते. मात्र, विसर्जन मिरवणुकीला दोन आठवडे उलटूनही पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. हरित लवाद आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ठोस कारवाई होत नसल्याचा मुद्दा मंचाने उपस्थित केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *