![]()
भारतासारख्या प्रगत असलेल्या देशात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाइल प्रत्येकाच्या हाती आहे. मात्र त्यातून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता आपण पुस्तक वाचनातून खऱ्या अर्थाने ज्ञानी व्हावे. जीवनात यश मिळवायचे असेल तर पुस्तक “वेडे “व्हा. तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी माणूस म्हणून घडवतील” असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते व माणुसकीची शाळाचे प्रणेते शिवाजी नाईकवाडी यांनी व्यक्त केला. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिनी” अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी हिंद सेवा मंडळाच्या संचालक प्रा. ज्योती कुलकर्णी, रूपाली सोनवणे, वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे, मुख्याध्यापक अशोक डोळसे, ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, संजय गाडेकर आदी उपस्थित होते.
प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना वाचन, खेळ, लेखन यातून युवा वर्गाचे व्यक्तिमत्व घडते. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा वाचनातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेला यशाचा व कार्याचा आदर्श आज आपल्यासमोर आहे. आपण अखंडपणे वाचन करून आपल्या ही जीवनात यश मिळवावे असे प्रतिपादन केले. जिल्हा वाचनालयाच्यावतीने दादा चौधरी शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत सभासदत्व देण्यात येणार आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक अशोक डोळसे यांनी “वाचनातून मिळालेली प्रेरणा ही आपल्याला बिकट परिस्थितीतही यशाच्या मार्गावर घेऊन जाते. शालेय जीवनात वाचनाचे संस्कार हे पुढील यशस्वी जीवनासाठी प्रेरक असल्याने विद्यार्थीदशेत वाचनाच्या संस्काराची कास धरणे महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. यावेळी दादा चौधरी शाळेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा पुस्तके देऊन सन्मान केला. विद्यार्थ्यांनी वाचली विविध पुस्तके वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणाची शपथ घेतली. यामध्ये खुशी दरेकर, साई ठोंबे, प्रिन्स वाघमारे, ऋषिकेश सपकाळ, अनुष्का चंगेडिया, सुदर्शन जाधव, साईनाथ म्हस्के, रवी राठोड, यश काळे, यश चव्हाण यांनी विविध पुस्तक वाचन करून आपला सहभाग नोंदवला.
Source link
मोबाइलच्या युगात पुस्तकांशी मैत्री करा- नाईकवाडी:सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नाईकवाडी यांचे आवाहन, वाचन प्रेरणा दिन उत्साहात