Headlines

रानडुकरे, रोही अन् माकडांच्या उपद्रवामुळे कापसाचे नुकसान:पंचनामे, भरपाई, सिंगल फेजसाठी पालकमंत्र्यांना साकडे‎




रानडुकरे, रोही व माकडांच्या उपद्रवामुळे पिकांचे नुकसान होत असताना सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्याने रात्री पिकांचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामे, नुकसानभरपाई व वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यासाठी अमरावती व दर्यापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घातले आहे. त्यांना निवेदन सादर केले आहे. अमरावती तालुक्यातील अऱ्हाड येथे रानडुकरांच्या कळपाने तूर व कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळी रानडुकरांनी शेतांमध्ये हैदोस घातला. त्यामुळे त्या पिकांचे पंचनामे तातडीने संबंधित यंत्रणेकडे सादर करून भरपाई द्यावी. एवढेच नव्हे तर सौर ऊर्जेचा आग्रह न धरता वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी कुंपण अनुदान मंजूर करावे. अऱ्हाड ॲग्रीकल्चर फीडरवरील सिंगल फेज वीजपुरवठा त्वरित सुरू करावा. अशी मागणी किरण प्रकाश पोकळे, विजय शामराव पोकळे व प्रकाश शामराव पोकळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनातील मजकुरानुसार अऱ्हाड येथील नुकसानग्रस्त शेतातील तूर व कपाशी पिकांची संबंधित अधिकारी व उपस्थितांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पोलीस पाटील विनोद डकरे, कृषी सहायक प्रियंका पाटबाजे, शेतकरी विजय पोकळे, किरण पोकळे, बाळू यमगर, वन अधिकारी अमोल खैरकर आणि तलाठी प्रीती कराळे आदी उपस्थित होते. या पाहणीनंतर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला पावसाअभावी सोयाबीन आणि इतर नगदी पिके गमावली गेली. त्यामुळे शेतकरी आता कापूस आणि तुरीला जपतो आहे. भविष्यात हीच दोन पिके काही प्रमाणात आधार देऊ शकतात. मात्र वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतकऱ्यांवर सुलतानी संकट घोंघावते आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने, मुख्यत्वे वन विभागाने, त्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा. नाहीतर भविष्यात आंदोलन करावे लागेल, असा इशारा अमरावती आणि दर्यापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. ^पावसाअभावी केवळ शेतकरीच अडचणीत आला नसून शेतमजुरांचे जगणेही कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य गरीब नागरिक शेतमजुरी करतात. त्यांच्या जगण्याचा तोच एक मोठा आधार असतो. सध्या शेतीची कोणतीही कामे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतमजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान घोषित केले, त्याच धर्तीवर अनुदान मिळाले पाहिजे. – संजय मंडवधरे, अध्यक्ष, अ. भा. शेतमजूर युनियन, अमरावती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *