![]()
तालुक्यातील अनकवाडी येथील अर्पित मंगेश मुंद्रे (वय १८) हा आयटीआयचा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी महाविद्यालयात गेलेला अर्पित घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अर्पित हा गुरुकुंज मोझरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वेल्डर ट्रेडच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अनकवाडी येथून तो दररोज आयटीआयमध्ये ये-जा करतो. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता तो नेहमीप्रमाणे घरून निघाला होता. मात्र, संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने वडील मंगेश रामकृष्ण मुंद्रे (वय ४८) आणि कुटुंबीयांनी महाविद्यालय परिसर, नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला. परंतु तो कोठेही आढळून आला नाही. अखेर वडिलांनी तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विद्यार्थी बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत असून, त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. घटनेचा पुढील तपास तिवसा पोलिस करत आहेत.
Source link
आयटीआयचा विद्यार्थी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा:वडिलांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांत तक्रार दाखल