Headlines

युवतींच्या हातात लाठी-काठी अन् मनात निर्भयतेची मशाल:भारदे हायस्कूलच्या 75 युवतींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे; पाच दिवसीय शिबिराचा समारोप‎



हातात लाठी-काठी, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि संकटांना सामोरे जाण्याची जिद्द… अशा उत्साहपूर्ण वातावरणात आनंदवन येथे ७५ युवतींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवले. बदलत्या काळात मुलींनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर स्वतःच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही सक्षम व्हावे. भीती

.

संकल्प अभिनव भारत फाऊंडेशन, पुणे आणि पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त आनंदवन येथे युवतींसाठी पाच दिवसीय लाठी-काठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शाळेतील ७५ विद्यार्थिनींनी सहभाग घेत प्रशिक्षण पूर्ण केले.

स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मुलींना संकटाच्या वेळी प्रसंगावधान राखण्यास, आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करते. लाठी-काठीच्या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना पारंपरिक युद्धकलेची ओळख करून देतानाच शिस्त, एकाग्रता आणि धैर्याचे महत्त्वही शिकवण्यात आले. १७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थिनींनी लाठी-काठीची चित्तवेधक प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या कौशल्यपूर्ण हालचाली, शिस्तबद्ध सादरीकरण आणि आत्मविश्वासाने उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव हरीश भारदे, संकल्प अभिनव भारत फाऊंडेशनचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख, नगरसेवक आशुतोष डहाळे, बाळासाहेब देशपांडे, डॉ. कृष्णा देहादराय यांच्यासह मान्यवर व पालक उपस्थित होते. सेन्सई विशाल गडकरी यांनी प्रशिक्षक, तर साईनाथ गायके यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. प्राचार्य उमेश घेवरीकर, प्रदीप बोरुडे, नितीन शेळके आणि सुरेश कुसळकर यांनी शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. शिक्षणासोबत स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करून मुलींनी आत्मनिर्भर व्हावे आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *