Headlines

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक:भाजपला पदवीधरांचे नो टेन्शन; शिक्षकांची धास्ती, पालकमंत्री गोरे, भाजप आमदारांचा संस्था भेटीवर भर




पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असला तरी शिक्षक मतदारसंघात बंडखोर व अपक्षांचेही आव्हान असेल. भाजपला पदवीधर निवडणुकीची फारशी चिंता नाही. शिक्षक मतदार संघात मात्र शिवसेना, अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत व ‘स्वेरी’चे पी. बी. रोंगे यांच्यामुळे स्थानिक मतदानाचे विभाजन होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून आहेत. संस्था व शिक्षकांच्या गाठीभेटीवर त्यांचा व भाजप आमदारांचा भर आहे. पदवीधरमध्ये भाजपाच्या स्मिता जाधव, आघाडीच्या हर्षदा देशमुख यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी भाजपाचे कौस्तुभ गावडे, आघाडीचे जयंत आसगावकर, शिवसेना पुरस्कृत सचिन सानप, अपक्ष माजी आमदार दत्तात्रय सावंत, पंढरपूरच्या ‘स्वेरी’ संस्थेचे प्रमुख पी. बी. रोंगे हे रिंगणात आहेत. गावडे व आसगावकर हे दोघेही कोल्हापूरचे उमेदवार आहेत. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील मतदार खेचण्यात त्यांच्या स्पर्धा आहे. पण भाजप, शिवसेना व आघाडीने सोलापूरचे उमेदवार न दिल्यामुळे जिल्ह्यातील दोन मातब्बर उमेदवार सावंत आणि रोंगे हे स्थानिक मतदारांच्या जोरावर नशिब आजमावत आहेत. म्हणूनच भाजपला पदवीधरच्या निवडणुकीचे फारसे आव्हान वाटत नाही. पण शिक्षक मतदार संघात चौरंगी लढतीमुळे पसंतीच्या पहिल्या व दुसऱ्या मतांवर भाजपचे भवितव्य अवलंबून असेल. शिवसेनेचे सानप, अपक्ष दत्तात्रय सावंत यांनी सोलापुरात ताकद लावली. सावंत हे याच मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी 3 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. त्यावेळी भाजपने सोलापुरातीलच जितेंद्र पवार हे उमेदवार दिल्याने जिल्ह्यातील मतांत फाटाफूट झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे आसगावकर हे विजयी झाले. या वेळी सोलापूरच्या मतांवर सावंत व रोंगे या दोघांनाही आशा आहे. गेल्या तीन वर्षात सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद मात्र चांगलीच वाढली आहे. त्याचा फायदा घेत पालकमंत्री जयकुमार गोरे व सर्व स्थानिक आमदारांनी सर्व शिक्षण संस्थाचालक, शिक्षकांच्या थेट गाठीभेट घेत हे मतदान गावडे यांच्याकडे वळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पालकमंत्री गोरे यांनी नुकतीच होटगी मठाचे महास्वामी व काही संस्थाचालकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही महास्वामींची भेट घेतली. निवडणूक जाहीर झाल्यापासून युती, आघाडीचे उमेदवार सोलापूरकडे फिरकले नव्हते. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी सोलापूरमध्ये हजेरी लावली. त्याउलट दत्तात्रय सावंत व रोंगे यांनी मात्र स्थानिक मतदारांशी सुरुवातीपासून संपर्क ठेवला आहे.‎‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *