![]()
लासूर स्टेशन जिल्हास्तरीय खो-खो आणि कराटे स्पर्धेत लासूर स्टेशन येथील न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. १९ वर्षांखालील मुलांच्या खो-खो संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर १७ वर्षांखालील संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. याशिवाय १९ वर्षांखालील कराटे स्पर्धेतही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर धडक मारली. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी विभागीय क्रीडा संकुलात १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नऊ तालुक्यांतील संघ सहभागी झाले होते. चुरशीच्या सामन्यांत न्यू हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित १९ वर्षांखालील कराटे स्पर्धेत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या यशासाठी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक मनोज पारधी यांचे मार्गदर्शन लाभले. शालेय समितीचे अध्यक्ष विश्वास पाटील, मुख्याध्यापक सुनील निकम, पर्यवेक्षक संजय गुळवे, प्राध्यापक रितेश बसये, खेडकर, वाघमारे, गायके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. खो-खो,कराटे स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
Source link
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत न्यू हायस्कूलची चमकदार कामगिरी:19 वर्षांखालील मुलांचा संघ जिल्ह्यात प्रथम