![]()
धरणांत पाणी असूनही शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळत नसेल, तर या पाण्याचा उपयोग कोणासाठी? फळबागा आणि पिके दुष्काळाच्या झळा सोसत असताना आवर्तनाची तारीख जाहीर का होत नाही? अशा आक्रमक सवालांनी श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांनी घारगाव येथे नगर-दौंड महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातून जलसंपदा विभाग आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. म्हस्के म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाण्यापेक्षा निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडणारे आमदार विक्रम पाचपुते यांनी आवर्तनाच्या तारखेबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी. तलावांतील पाणी उपशावरील बंदी कायम ठेवून शेतकऱ्यांना अडचणीत का आणले जात आहे? शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खासदार निलेश लंके यांच्या निवडीनंतर तालुक्याला काय मिळाले, असा प्रश्न उपस्थित करत म्हस्के यांनी जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या भूमिकेवर टीका केली. शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. तातडीने आवर्तन न सोडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत नलगे यांनी आवर्तनाची तारीख जाहीर न झाल्याने शेतकरी संकटात असल्याचे सांगितले. आम आदमी पार्टीचे राजेंद्र नागवडे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होत नसल्याची टीका केली. यावेळी भास्कर वागस्कर,डॉ. अनिल कोकाटे, एकनाथ बारगुजे, अशोक नवले, बाळासाहेब नलगे, राजेंद्र इधाटे,बापुसाहेब ऊर्फ मेजर निंभोरे गोरख उंडे यांनी मनोगत व्यक्त केले.नितीन डुबल, विश्वास थोरात, लक्ष्मण मचे, रघुनाथ खामकर, तुकाराम कळमकर, आप्पासाहेब शिंदे, सोपान शिंदे,सुभाष दरेकर, महादेव म्हस्के, राजेंद्र पोकळे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण बडवे यांनी, तर आभार शरद जगताप यांनी मानले. शेतकऱ्यांचे तीन थेट सवाल . आवर्तन सोडण्याची निश्चित तारीख कधी जाहीर होणार? .तलावांतील पाणी उपशावरील बंदी कधी उठणार? .फळबागा आणि उभी पिके वाचविण्यासाठी तातडीने पाणी कधी मिळणार?
Source link
संताप:आवर्तन कागदावर, पिके संकटात; शेतकऱ्यांचा घारगावात रास्ता रोको