“मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या प्रत्येक आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या शिवसेनेने नेहमीच खंबीरपणे पाठिंबा दिला आहे. असे असतानाही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अगदी पूर्वसं
.
बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना प्रतापराव जाधव यांनी 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपच्या टायमिंगवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या क्लिपमधून स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्यावरच पैसे घेतल्याचा आरोप होत असल्याने, जरांगेंनीच याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार देऊन आंदोलन छेडले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
विदर्भातील 99 टक्के मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र; तरीही आम्ही जरांगेंना साथ दिली!
शिवसेनेने मराठा आरक्षणाच्या लढ्यात दिलेल्या योगदानाची आठवण करून देताना प्रतापराव जाधव म्हणाले, “मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी संघर्ष करत आहेत. आम्ही विदर्भातील मराठा समाजाचे लोक आहोत आणि आमच्याकडे परंपरागत 99 टक्के लोकांकडे आधीपासूनच कुणबी प्रमाणपत्र आहे. तरीदेखील केवळ आपल्या समाजाचा एक जिव्हाळ्याचा आणि सामाजिक प्रश्न म्हणून आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना पक्षाने जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाचे सातत्याने समर्थन केले आणि त्यांना भक्कम पाठिंबा दिला.”
2.5 वर्षांपूर्वीची क्लिप मतदानाच्या आदल्याच दिवशी कशी आली?
ऑडिओ क्लिपच्या संभाषणावर आणि तिच्या वेळेवर बोट ठेवत जाधव यांनी संशय व्यक्त केला. “काल विधान परिषद (पदवीधर व शिक्षक) निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे पूर्वसंध्येला ही ऑडिओ क्लिप समोर आणली गेली. त्यातील संभाषण ऐकले तर त्यात विधानसभा निवडणुकीचा उल्लेख आढळतो, यावरून ही क्लिप सुमारे 2.5 वर्षांपूर्वीची असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते.”
श्रीकांत शिंदेंचे नाव गोवण्याचा प्रकार
“विशेष म्हणजे या संपूर्ण संभाषणात बोलणारी एकही व्यक्ती शिवसेनेची नाही, त्यामध्ये कोणताही शिवसैनिक किंवा पदाधिकारी सहभागी नाही. तिथे बसलेल्या इतर लोकांच्या तोंडून केवळ आमचे युवा नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतले गेले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा आणि वातावरण खराब करण्याचा हा काही शक्तींचा डाव आहे का, हे तपासले गेले पाहिजे.”
एसआयटी आणि फॉरेन्सिक चौकशी करा; जरांगेंनी स्वतःच तक्रार करून आंदोलन करावे!
या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कठोर तपासाची मागणी करताना प्रतापराव जाधव म्हणाले, “ही ऑडिओ कॅसेट खरी आहे की खोटी, याचा छडा लावण्यासाठी तिची तात्काळ फॉरेन्सिक तपासणी झालीच पाहिजे. तसेच यामागील मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी लावावी. जर ही क्लिप खरी असेल, तर त्यात बोलणारे ते लोक नेमके कोण आहेत, त्यांना कोणी बसवले होते, हे महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे.”
जरांगे पाटलांना सल्ला
“खरे पाहिले तर या क्लिपमध्ये जरांगे पाटलांना पैसे दिल्याचा उल्लेख करून त्यांच्यावरच थेट आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनीच स्वतः पुढे येऊन या प्रकरणाची पोलिसांत तक्रार नोंदवली पाहिजे. नेहमीप्रमाणे जसे ते आवाज उठवतात, तसेच या बदनामीविरोधात आणि सत्य बाहेर काढण्यासाठी त्यांनी एखादे आंदोलनच केले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्याकडे मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व म्हणून पाहतो, त्या एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा हा कट आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही,” असेही प्रतापराव जाधव यांनी ठणकावून सांगितले.
—————————————————–
हेही वाचा…
SITची नाटकं बंद करा, आधी 500 कोटींचा FIR दाखल करा: ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- डुप्लिकेट चाणक्याचे दिवस संपले

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, या प्रकरणाची एसआयटी किंवा फॉरेन्सिक चौकशी करण्याऐवजी आधी एफआयआर दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी