![]()
कन्नड राज्यातील भीषण दुष्काळाचे तातडीने निवारण करून शेतकरी, वनहक्क दावेदार व भूमिहीन ग्रामीण कष्टकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, असंवैधानिक एसआयआर प्रक्रिया बंद करावी, तसेच आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करून वनहक्कधारकांना संपूर्ण हक्काचा सातबारा उतारा देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने गुरुवारी कन्नड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. हातात लाल बावटा व फलक घेऊन आंदोलकांनी ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘एकच नारा सातबारा सातबारा’, ‘हमारी मांगे पूरी करो’, ‘जय जवान जय किसान’, ‘जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’ आणि ‘संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शेतकरी, आदिवासी, वनहक्क दावेदार, भूमिहीन शेतमजूर, महिला आणि विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदार सारिका भगत यांच्या वतीने नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी निवेदन स्वीकारून मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात करणसिंग कोकणी, किशोर ढमाले, रणजित गावित, कॉ. आर.टी. गावीत, होमाबाई गावीत, कॉ. शितल गावित, रावजी पथवे, रतन मधे, बाळू मेंगाळ, बुधा गावंडे, वच्छलाबाई वाघ, सखुबाई मेंगाळ, कौसाबाई पथवे, शांताबाई मेंगाळ, मावजी दोरे, नथू गांगड, कडूबा ननावरे, रमेश थोरात, बाळू थोरात, विष्णू थोरात, जयराम पथवे, धोंडीराम पथवे, कैलास पालोदकर आणि हरिचंद्र तळेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कष्टकरी सभेच्या वतीने कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
Source link
सत्यशोधक कष्टकरी सभेचा कन्नड तहसीलवर मोर्चा:दुष्काळी मदत व सातबारा देण्याची मागणी