![]()
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या माळशिरस तालुक्याचा विकास होण्यात येथील दर्जेदार शैक्षणिक संस्था आणि शिक्षण संस्थाचालकांचे मोठे योगदान आहे. या तालुक्याचा इतिहास अनेक दिग्गज लेखकांनी आपल्या लेखणीतून मांडला आहे. मात्र, शिक्षणाच्या माध्यमातूनच तालुक्याच्या विक
.
शंकरनगर-अकलूज येथील उदय सभागृहात लेखक रोहित देशमुख लिखित आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘तीन तेरा’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टचे संचालक विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला.
प्रारंभी लेखक रोहित देशमुख यांनी आपल्या जडणघडणीत मोहिते-पाटील परिवाराचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकांविषयी शासनाचे उदासीन धोरण यामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राथमिक शिक्षणातच विद्यार्थ्यांचा पाया भक्कम झाला नाही, तर त्यांच्या भवितव्याची इमारत कशी उभी राहणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे शरद तांदळे, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहायक संपादक डॉ. दत्ता घोलप आणि पुअहो सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. केदार काळवणे यांनी विचार व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने-देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील, प्रा. हरिभाऊ मगर, सूर्यकांत भिसे, प्रा. विष्णू सुर्वे, डॉ. विश्वनाथ आवड, डॉ. बाळासाहेब मुळीक, संचालक अनिल जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. रोहित देशमुख यांच्या ‘तीन तेरा’ या कादंबरीत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शैक्षणिक वास्तव शिक्षकाच्या दृष्टिकोनातून मांडले आहे. शिक्षणाच्या खासगीकरणानंतर बदललेले शैक्षणिक वातावरण, ध्येयवादी तरुण शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या, तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालकांची मानसिकता यांचा वेध या कादंबरीत घेतला आहे. खासगी शाळांतील शिक्षकांची पिळवणूक, संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यातील मालक-सालगडीसारखे संबंध, तसेच गुणवत्तेपेक्षा आर्थिक व्यवहारांना महत्त्व देत होणाऱ्या नियुक्त्या, अशा शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर कादंबरी प्रकाश टाकते. या आशयातील जमेच्या बाजू अधोरेखित करतानाच जीवनदर्शनाचा व्यापक पट उभा करण्यात कादंबरीला येणाऱ्या मर्यादाही उदाहरणांसह डॉ. दत्ता घोलप यांनी स्पष्ट केल्या.
शिक्षकांच्या मूळ कार्यावर परिणाम : डॉ. काळवणे शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त विविध कामांमध्ये गुंतवून ठेवल्यामुळे त्यांच्या मूळ कार्यावर परिणाम होतो. शिक्षकाला शिक्षक म्हणून काम करण्याऐवजी सर्व कामे करणारा कर्मचारी बनवले जाते, तेव्हा त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचे परखड चित्रण ‘तीन तेरा’ या कादंबरीत करण्यात आल्याचे केदारनाथ काळवणे यांनी सांगितले.