![]()
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर आणि महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटातील गळतीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. निवडणुकीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असतानाच, आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एक बडा नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘मातोश्री’वर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव यांनी गैरहजेरी लावल्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षंतराच्या चर्चांना आता अधिक उधाण आले आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली होती. या बैठकीला अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. दरम्यान, खासदार संजय जाधव यांनी कौटुंबिक कारणास्तव बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, प्रत्यक्षात ते आपल्या मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय दिसत असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मार्च महिन्यात उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीलाही जाधव यांनी दांडी मारली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यासह परभणीचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद अहिरराव व चार तालुकाप्रमुखांनी बैठकीला अनुपस्थित राहणे पक्षांतराच्या चर्चेला बळ देणारे ठरत आहे. तसेच चार दिवसांपूर्वीच परभणीच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत संजय जाधव यांनी आपली अस्वस्थता शिवसैनिकांसमोर बोलून दाखवली होती, त्यामुळे या सलग अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Source link
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?:खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण; 'मातोश्री'वरील बैठकीला अनुपस्थित