![]()
बारामती विमानतळाजवळील गोझुबावी परिसरात स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचा आरोप असलेला शिपिंग व्यावसायिक राणा सूर्यवंशी याच्या सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याचा संशय असून त्यासाठी अनेक जिल्ह्यांतील पोलिसांचा वापर आणि शासकीय यंत्रणेच्या संभाव्य गैरवापराचे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे शहर, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यांतील पोलिस सूर्यवंशीच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिस महासंचालक कार्यालयाकडून त्याच्या व्हीआयपी सुरक्षेची सखोल चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळाजवळील पालखी महामार्गावरील पायलट ढाब्याच्या परिसरात सूर्यवंशीवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ येत पिस्तुलाचा धाक दाखवून धारदार शस्त्राने वार केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा हल्ला नसून सूर्यवंशीने साथीदारांच्या मदतीने रचलेला कट असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणामुळे केवळ कथित हल्ल्याच्या कटापुरताच तपास मर्यादित राहिलेला नाही तर सूर्यवंशीला सुरक्षा कोणी आणि कोणत्या निकषांवर उपलब्ध करून दिली याचीही चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्ष तैनात पोलिसांची पडताळणी होणार वाय प्लस सुरक्षेचा गैरवापर करून सूर्यवंशीने दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्त कला शिक्षण संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात संबंधितांवर दबाव आणण्यासाठी आणि धाक दाखवण्यासाठी पोलिस संरक्षणाचा वापर झाला का, याचा तपास सुरू आहे. सूर्यवंशीच्या सुरक्षा व्यवस्थेची मंजुरी आणि प्रत्यक्ष तैनात पोलिसांचीही पडताळणी होणार आहे. हे प्रश्न आहेत अनुत्तरित कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सूर्यवंशीसोबत पुणे ग्रामीण पोलिसांव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतील पोलिसही उपस्थित असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुणे ग्रामीणचे तीन पोलिस सूर्यवंशीसोबत होते, मात्र अन्य तीन ते चार जिल्ह्यांतील पोलिसही त्या वेळी उपस्थित होते. या बंदोबस्ताबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रवीण पडवळ माहिती घेऊन पोलिस महासंचालक कार्यालयाला अहवाल देऊ शकतात. प्रकरणाचा तपास सुरू असून बंदोबस्तासंदर्भात स्वतंत्र लेखी चौकशीचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. हल्ल्यानंतर सूर्यवंशीच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि पोटावर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्याच्यावर पाच ते सहा दिवस उपचार करण्यात आले. या काळात पोलिसांनी त्याचा प्राथमिक जबाब नोंदवला होता. मात्र, घटनेच्या वेळी त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस सोबत नसल्याचे समोर आल्याने जबाबातील विसंगती आणि संशयास्पद बाबींची पडताळणी सुरू झाली.
Source link
वाय प्लस सुरक्षेचा गैरवापर:राणा सूर्यवंशीच्या दिमतीला अनेक जिल्ह्यांतील पोलिस, व्हीआयपी सुरक्षेची सखोल चौकशी होण्याची शक्यता