![]()
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन आणि तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील मुला-मुलींना आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळेतील सर्व मुला-मुलींची वैद्यकीय पथकाद्वारे सखोल आरोग्य तपासणी पार पडली. तसेच राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन विद्यार्थ्यांना वयात येताना होणारे शारीरिक बदल, वैयक्तिक स्वच्छता आणि उत्तम आरोग्याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. या शिबिरासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल डोके आणि औषध निर्माता आकाश चावरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक सूचना दिल्या, तर आरकेएसकेचे समुपदेशक अतुल मुळे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक धडे दिले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर रोजी सोयगाव तालुक्यात १ ते १९ वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या व औषध देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. या दिवशी कोणत्याही कारणास्तव औषधापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती सोयगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांनी दिली. दरम्यान, सोयगाव तालुक्यातील विविध शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
Source link
फर्दापूर जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी:विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे केले वितरण