![]()
“राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयावह आणि भीषण आहे. शेतात पाणी नाही, हाताला काम नाही, महागाई गगनाला भिडली असून सुशिक्षित मुलांच्या कॉलेज व मेसच्या फीसाठी पालकांकडे पैसे उरलेले नाहीत. अशा संकटात शासन केवळ ५,००० रुपयांची तुटपुंजी मदत देत आहे. बाजारात तेलाचा एक डबा २,६८० रुपयांना मिळतो, मग उरलेल्या पैशांत शेतकऱ्याने दिवाळी कशी साजरी करायची? कोल्हापूरच्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे १ लाख कोटी रुपये उपलब्ध आहेत, मग जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला हेक्टरी १ लाख रुपयांची थेट मदत देण्यासाठी यांच्या तिजोरीत खडखडाट का?” असा थेट व आक्रमक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. दौऱ्यावर असताना इंदापूर तालुक्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दुष्काळ, नरेगाची रखडलेली कामे, कर्जमाफी, उजनी व भीमाशंकर परिसरातील वादग्रस्त प्रकल्प, इथेनॉल धोरणातील धरसोड आणि ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. अटी-शर्तींचा जाच थांबवून सरसकट कर्जमाफी करा दुष्काळी उपाययोजनांच्या फोलपणावर बोट ठेवताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज मी लाकडी गावात गेले होते. तिथे २३ विहिरींची मागणी प्रलंबित असून अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. नरेगाची कामे, पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि निधी वाटपाचे थेट अधिकार स्थानिक स्तरावर वर्ग केले पाहिजेत.” गुगल मॅपच्या काळात पंचनाम्यांची नाटकं का? “शेतकऱ्यांना पीक जळाल्यावर, पाणी दिल्यावर आणि कापणी केल्यावर प्रत्येक वेळी मोबाईलवरून फोटो काढायला लावले जातात. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले असताना गुगल मॅप किंवा एरियल फोटोग्राफीच्या माध्यमातून उपग्रहावरून थेट दुष्काळाचे पंचनामे का होत नाहीत? शेतकऱ्यांना नाहक त्रास न देता इंदापूरसह संपूर्ण दुष्काळी तालुक्यांमध्ये कोणतीही अट न ठेवता ‘सरसकट कर्जमाफी’ जाहीर करावी.” नऊ महिने झाले, 9 हजार येणे बाकी “शासनाने स्वतः सुरू केलेल्या योजनेचे २०२६ मधील आधीचे ४,००० रुपये प्रलंबित आहेत आणि आताचे ५,००० असे एकूण ९,००० रुपये शासनाकडे येणे बाकी आहे. हेक्टरी १ लाख रुपयांची मागणी असताना ५ हजार देऊन बोळवण करणे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे.” मराठवाड्यात ९ महिन्यांत ७६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकरी आत्महत्यांच्या भीषण आकडेवारीवर चिंता व्यक्त करताना त्यांनी सरकारला धारेवर धरले. “मराठवाड्यात गेल्या ९ महिन्यांत ७६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यापैकी एकट्या बीड जिल्ह्यात १७० आत्महत्या झाल्या आहेत. संकटांवर संकटे येत असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. या जिल्ह्यात अनेक कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे. २०० आमदारांचे हे डबल इंजिन सरकार केवळ कागदावरच धावत आहे.” गरिबांना मोफत अन्नधान्य द्या “उत्तर प्रदेश सरकार स्वतःचे एक आणि केंद्र सरकारचे एक अशी दोन अन्नधान्याची पॅकेजेस गरीब व कष्टकऱ्यांना देते. मग महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार अतिरिक्त अन्नधान्य वाटप का सुरू करत नाही? साखर कारखाने, दूध संघ आणि जिल्हा बँकांनीही या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.” इथेनॉल धोरणात सरकारचा सावळा गोंधळ केंद्राच्या इथेनॉल धोरणावर त्यांनी ताशेरे ओढले. “साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असताना, १ नोव्हेंबरपासून इथेनॉल उत्पादनावर निर्बंध आणले जात आहेत. कारखान्यांचा मूळ नफा इथेनॉलवर असतो, त्यातूनच उसाची बिले निघतात. हा निर्णय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे.” धोरणांत स्थिरता नाही “एका बाजूला शासन १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांना मंजुरी देते आणि दुसरीकडे इथेनॉल निर्मितीच बंद करते. मग या गाड्या चालणार कशावर? या सरकारच्या एका खात्याचा दुसऱ्या खात्याशी ताळमेळ नाही; डाव्या हाताला काय चालले आहे हे उजव्या हाताला समजत नाही, असा सावळा गोंधळ सुरू आहे.” उजनीचा डेटा सेंटर असो वा भीमाशंकरची वृक्षतोड; स्थानिकांना विश्वासात का घेत नाही?” विकास विरुद्ध पर्यावरण वादावर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “उजनी धरणातील एआय डेटा सेंटरच्या प्रकल्पाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाला पत्र लिहून याला वाचा फोडली. ३१ तारखेला धैर्यशील दादा आणि आमदार रोहित पवार याविरोधात आंदोलन करत आहेत.” स्थानिक जनतेवर दडपशाही नको “शरद पवार साहेबांनी इंदापूरमध्ये सिनार मासचा प्रकल्प आणला, एमआयडीसी वाढवली, रस्ते आणि उजनी धरण उभे केले; इंदापूरकरांनी नेहमी सहकार्यच केले. मग आज कर्जत-भीमाशंकर येथील ३,००० मेगावॉटच्या प्रकल्पासाठी जनतेला विश्वासात का घेतले जात नाही? विकासाला विरोध नाही, मात्र ‘एल निनो’ आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संकट असताना पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे.” ठाण्यात कर्त्या पुरुषाची हत्या झाली, त्या मुलाला न्याय द्या ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण आणि मध्य प्रदेशातील घटनेवर त्या म्हणाल्या, “ठाण्यात रस्त्यावर उतरून टायर जाळले जात आहेत. जेव्हा शासन ऐकत नाही, तेव्हाच जनतेला आंदोलने करावी लागतात. त्या घरातला कर्ता पुरुष गेला आहे, त्यांच्या कुटुंबाच्या भावनांचा आदर करून शासनाने तत्काळ निष्पक्ष न्याय द्यावा.” चित्त्याच्या अंगात 5 गोळ्या कशा? “मध्य प्रदेशच्या कुनो जंगलात १९ महिन्यांच्या चित्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्याच्या शरीरात ५ गोळ्या सापडल्या, हे अत्यंत धक्कादायक आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वनविभागाने याचे तात्काळ स्पष्टीकरण दिले पाहिजे.” राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर विचारले असता, “आज माझ्या भावाला (अजित पवार यांच्या संदर्भातील भावना) जाऊन ९ महिने झाले आहेत, त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही,” असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. ———————————————————– हेही वाचा… मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा
Source link
गुगल मॅपच्या काळात पंचनाम्यांची नाटकं का?:मराठवाड्यात 9 महिन्यांत 760 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; उत्तर प्रदेशप्रमाणे दोनदा मोफत धान्य द्या -सुप्रिया सुळे